अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबाग शहरातील दिवसेंदिवस वाढत असलेली वाहतूक कोंडी, वाहनांची वाढती संख्या आणि पार्किंगची समस्या लक्षात घेता शहरासाठी सर्वसमावेशक वाहतूक व पार्किंग आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. या आराखड्याला अंतिम मंजुरी देण्यापूर्वी आज शहरातील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करून वाहतुकीच्या समस्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या पाहणीदरम्यान शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठ परिसर, गर्दीची ठिकाणे, वाहतूक कोंडी निर्माण होणारे मार्ग, पार्किंगची आवश्यकता असलेले भाग तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या बाबींची पाहणी करण्यात आली. प्रत्यक्ष परिस्थितीचा अभ्यास करून भविष्यातील वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
या पाहणीमध्ये डीवायएसपी श्रीमती मोरे, वाहतूक जिल्हा पोलीस शाखेच्या एपीआय श्रीमती लाड, वाहतूक विभागाचे अधिकारी झेमसे, अलिबाग नगरपरिषदेचे कर्मचारी प्रशांत नांदगावकर यांच्यासह संबंधित कर्मचारी सहभागी झाले होते.
यावेळी अलिबाग नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा ॲड. मानसीताई म्हात्रे स्वतः उपस्थित राहून पाहणीमध्ये सहभागी झाल्या. शहरातील वाहतूक कोंडीची समस्या प्रत्यक्ष समजून घेत तिच्यावर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने प्रशासन व पोलीस यंत्रणेशी चर्चा करण्यात आली.
शहरातील वाढती लोकसंख्या, पर्यटनाचा वाढता ओघ आणि वाहनांची संख्या लक्षात घेता नियोजनबद्ध वाहतूक व्यवस्था व पुरेशा पार्किंग सुविधांची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रस्तावित वाहतूक व पार्किंग आराखड्यामुळे शहरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असून, अलिबागकरांना वाहतूक कोंडीपासून लवकरच दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
Home ताज्या बातम्या अलिबाग शहर वाहतूक व पार्किंग आराखड्यासाठी प्रत्यक्ष पाहणी; कोंडीच्या ठिकाणांचा घेतला आढावा





