आगरी समाज संस्थानच्या नवीन कार्यालयाचा उत्साहात शुभारंभ


आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या हस्ते उद्घाटन; समाजोपयोगी उपक्रमांना मिळणार नवी दिशा

अलिबाग(प्रतिनिधी) : अलिबाग येथील ‘आगरी समाज संस्थान’च्या नवीन कार्यालयाचा शुभारंभ अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या शुभहस्ते व प्रमुख उपस्थितीत रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या नवीन कार्यालयामुळे आगरी समाजाच्या विविध सामाजिक, शैक्षणिक व समाजोपयोगी उपक्रमांना अधिक संघटित स्वरूप देण्यास मदत होणार आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या हस्ते नवीन कार्यालयाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी आगरी समाज संस्थानचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आगरी समाजाच्या सामाजिक व संघटनात्मक वाटचालीत संस्थेची भूमिका महत्त्वाची असून, नवीन कार्यालय हे समाजाच्या विविध उपक्रमांसाठी प्रभावी केंद्र ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. समाजातील नागरिकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा, सामाजिक उपक्रमांचे नियोजन, युवक व विद्यार्थ्यांसाठी उपक्रम तसेच समाजातील एकोपा आणि संघटन अधिक मजबूत करण्यासाठी या कार्यालयाचा उपयोग होणार आहे.

आगरी समाजाच्या प्रगतीसाठी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने संस्थेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जातील, अशी भावना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

या सोहळ्याला शिवसेना शहरप्रमुख अलिबाग विकास कर्णेकर यांच्यासह आगरी समाज संस्थानचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव उपस्थित होते. नवीन कार्यालयाच्या शुभारंभाबद्दल उपस्थित मान्यवरांनी संस्थेला शुभेच्छा देत आगामी काळातील सामाजिक कार्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.