भविष्यात रायगडची मोठी जबाबदारी मिळण्याची चर्चा; पंडितशेठ पाटील यांनी दिल्या शुभेच्छा
रायगड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री मा. ना. श्री. भरत गोगावले यांची माजी आमदार पंडितशेठ पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी रायगड जिल्ह्यातील विविध विकासकामे, प्रलंबित प्रश्न तसेच आगामी काळातील विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
रायगड जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी विविध विभागांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, रोजगाराच्या संधी, फलोत्पादन क्षेत्र तसेच खारभूमी विकासाशी संबंधित प्रश्नांवर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
दरम्यान, आगामी काळात मंत्री भरत गोगावले यांच्याकडे रायगड जिल्ह्याची मोठी जबाबदारी सोपविली जाण्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्यांना रायगडचे पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार पंडितशेठ पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून भावी जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.
रायगडच्या विकासासाठी अनुभवी नेतृत्व, प्रशासनाशी समन्वय आणि विविध विकासकामांना गती देण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. मात्र, पालकमंत्रीपदाबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसून, याबाबतचा अंतिम निर्णय शासनस्तरावर होणार आहे.





