पीएनपीच्या अभिषेक सिंहची दमदार कामगिरी दक्षिण विभागीय स्पर्धेतून राष्ट्रीय स्तरासाठी निवड


अलिबाग(प्रतिनिधी): होली चाईल्ड सीबीएसई स्कूलच्या इयत्ता आठवीतील विद्यार्थी अभिषेक सिंह याने ॲथलेटिक्समध्ये उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

शिर्डी येथील द्रोणा अकॅडमी येथे आयोजित सीबीएसई क्लस्टर-९ ॲथलेटिक्स मुला-मुलींच्या स्पर्धेत अभिषेकने १४ वर्षांखालील मुलांच्या गोळाफेक प्रकारात १०.५० मीटर अंतराची उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांकासह रौप्यपदक पटकावले.

या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर अभिषेकची सीबीएसई दक्षिण विभागीय ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच दक्षिण विभागीय स्तरावरील कामगिरीच्या आधारे त्याची राष्ट्रीय स्तरावरील ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे अभिषेकच्या या यशाने शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीला नवी उंची मिळाली आहे.

अभिषेकच्या मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण सरावाचे कौतुक करत शाळेच्या वतीने त्याचे अभिनंदन करण्यात आले. तसेच या नेत्रदीपक यशाबद्दल पी.एन्.पी. संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांनी सातत्यपूर्ण प्रोत्साहन दिलेच पण त्याचे विशेष कौतुक देखील केले.

अभिषेकच्या या उल्लेखनीय यशाबद्दल होली चाईल्ड सीबीएसई शाळेच्या मुख्याध्यापिका एम्. वैल्लैयम्माल, उपमुख्याध्यापिका सदाफ शहाबाजकर, क्रीडा प्रशिक्षक आदित्य यादव, विद्यार्थी आणि पालकांनी त्याचे अभिनंदन करून त्याला राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.