घणसोलीत मद्यधुंद कारचालकाने पाच ते सहा वाहनांना दिली जोरदार धडक


नवी मुंबई (प्रतिनिधी): नवी मुंबईतील घणसोली सेक्टर-९ परिसरात सोमवारी दिनांक १० ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेतील कारचालकाने भरधाव वेगाने वाहन चालवत अनेक वाहनांना धडक दिल्याची घटना घडली. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या तसेच मार्गावरून जाणाऱ्या सुमारे पाच ते सहा दुचाकी व चारचाकी वाहनांना कारने एकापाठोपाठ धडक दिली. या अपघातात दोन ते तीन नागरिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून, अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सेक्टर-९ मधील रहिवासी परिसरातील रस्त्यावरून संबंधित कार भरधाव वेगाने जात होती. अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारने रस्त्यावरील आणि पार्क केलेल्या वाहनांना धडक दिली. काही क्षणांतच परिसरात एकापाठोपाठ वाहनांना धडक बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. कारचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समोर आल्यानंतर नागरिक संतप्त झाले. संतप्त नागरिकांनी चालकाला पकडून चोप दिला. दरम्यान, अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना स्थानिकांच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. चालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.