वृक्षलागवडीसोबतच झाडांच्या संगोपनाला प्राधान्य; नगराध्यक्षा अक्षया नाईक यांचा निर्धार
अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबाग शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देताना केवळ भौतिक सुविधा उभारण्यापुरता विकास मर्यादित न ठेवता शहर स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार करण्यावरही विशेष भर देण्यात येणार आहे. शहराच्या पर्यावरणीय समतोलासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्याबरोबरच लावलेल्या झाडांचे संगोपन आणि संवर्धन करण्याची जबाबदारीही गांभीर्याने पार पाडली जाणार असल्याचे अलिबाग नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अक्षया नाईक यांनी सांगितले.
अलिबाग हे पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे शहर असून शहराचे सौंदर्य आणि पर्यावरण यांना विशेष महत्त्व आहे. वाढते शहरीकरण, वाहनांची वाढती संख्या आणि विविध विकासकामांमुळे पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेता शहरात अधिकाधिक हरित क्षेत्र निर्माण करण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या माध्यमातून विविध ठिकाणी वृक्षलागवड, उद्याने विकसित करणे, उपलब्ध मोकळ्या जागांचे सुशोभीकरण तसेच सार्वजनिक ठिकाणी हरित पट्टे निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.
“अलिबागचा विकास करताना केवळ भौतिक सुविधा निर्माण करणे हा आमचा उद्देश नाही, तर शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार करण्यावरही आमचा भर आहे. आज लावलेले प्रत्येक रोप हे उद्याच्या अलिबागच्या पर्यावरणाची गुंतवणूक आहे. त्यामुळे वृक्षलागवडीसोबतच या झाडांचे संगोपन आणि संवर्धन करण्यालाही आम्ही प्राधान्य देणार आहोत,” असे नगराध्यक्षा अक्षया नाईक यांनी स्पष्ट केले.
वृक्षलागवड केल्यानंतर झाडांची नियमित देखभाल, पाणीपुरवठा, संरक्षण आणि आवश्यकतेनुसार संगोपनाची व्यवस्था करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे केवळ वृक्षलागवडीचे उद्दिष्ट न ठेवता लावलेल्या प्रत्येक रोपाचे जतन होईल, यासाठी नियोजन करण्याची भूमिका नगरपरिषदेने घेतली आहे.
शहरातील नागरिकांनीही या पर्यावरणपूरक उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखावी आणि लावलेल्या झाडांचे संरक्षण करावे, असे आवाहन करण्यात येणार आहे. नागरिकांचा सहभाग आणि नगरपरिषदेचे नियोजन यांच्या माध्यमातून अलिबाग शहराचा विकास अधिक पर्यावरणपूरक पद्धतीने करण्याचा प्रयत्न राहणार आहे.
स्वच्छता, हरितीकरण आणि शाश्वत विकासाच्या माध्यमातून अलिबागला अधिक सुंदर व पर्यावरणपूरक शहर बनविण्याचा संकल्प नगरपरिषदेने व्यक्त केला आहे.






