पाहणे, साठवणे, शेअर करणे किंवा प्रसारित करणेही कायद्याने गुन्हा; रायगड पोलिसांकडून सायबर पॅट्रोलिंगद्वारे कारवाई
रायगड(प्रतिनिधी) : बाल लैंगिक शोषणाशी संबंधित अश्लील फोटो, व्हिडिओ किंवा अन्य डिजिटल साहित्य (Child Sexual Abuse Material – CSAM) तयार करणे, साठवणे, शेअर करणे अथवा प्रसारित करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. अशा प्रकारच्या साहित्यापासून नागरिकांनी दूर राहावे आणि सोशल मीडिया किंवा इंटरनेटवर ब्राउझिंग करताना असे साहित्य आढळल्यास त्याची माहिती तात्काळ संबंधित यंत्रणांना द्यावी, असे आवाहन रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी केले.
पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी सांगितले की, बालकांचे लैंगिक शोषण किंवा अत्याचार कॅमेऱ्यात अथवा अन्य माध्यमातून चित्रित करून तयार केलेले फोटो किंवा व्हिडिओ अत्यंत गंभीर गुन्ह्याच्या कक्षेत येतात. भारतीय कायद्यांतर्गत अशा कृत्यांवर कठोर कारवाईची तरतूद आहे. माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम 67B तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) मधील संबंधित तरतुदींनुसार अशा प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल केले जाऊ शकतात.
अशा प्रकारचे साहित्य पाहणे, जाणूनबुजून साठवणे, डाउनलोड करणे, शेअर करणे, प्रसारित करणे किंवा तयार करणे यासंदर्भात कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी उत्सुकतेपोटीही असे साहित्य पुढे पाठवू नये किंवा आपल्या मोबाईल, संगणक अथवा अन्य डिजिटल उपकरणांमध्ये साठवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
रायगड पोलिसांच्या सायबर सेलमार्फत तसेच संबंधित केंद्रीय यंत्रणांच्या समन्वयातून सायबर पॅट्रोलिंग केले जात आहे. इंटरनेट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारचे साहित्य प्रसारित करणाऱ्या किंवा त्याच्याशी संबंधित बेकायदेशीर कृती करणाऱ्यांवर लक्ष ठेवले जात असून, कायद्याचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येणार असल्याचे दलाल यांनी स्पष्ट केले.
संशयास्पद साहित्य आढळल्यास काय करावे?
सोशल मीडिया किंवा इंटरनेटवर बाल लैंगिक शोषणाशी संबंधित फोटो अथवा व्हिडिओ आढळल्यास ते डाउनलोड, सेव्ह किंवा पुढे शेअर करू नये. त्याऐवजी तात्काळ संबंधित सायबर गुन्हे यंत्रणेला माहिती द्यावी. सायबर गुन्ह्यांबाबत 1930 या हेल्पलाइन क्रमांकावर माहिती देता येते.
“अशा प्रकारचे साहित्य आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तात्काळ पोलिसांना माहिती द्या. बालकांच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनीही सायबर गुन्ह्यांविरोधातील या लढ्यात सक्रिय सहभाग घ्यावा,” असे आवाहन पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी केले.









