एसआयआरच्या माध्यमातून मतदारांची नावे कमी करून भाजपला अप्रत्यक्ष मदत केल्याचा काँग्रेसचा आरोप


मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाईची मागणी; राजाभाऊ ठाकूर यांचा आरोप

रायगड (प्रतिनिधी):  निवडणूक आयोगाने राबविलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे मतदार यादीतून कमी करण्यात आली. या प्रक्रियेमुळे भाजपला निवडणुकीत विजय मिळवून देण्यासाठी अप्रत्यक्ष मदत झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांनी केला आहे.
SIR प्रक्रियेदरम्यान अनेक पात्र मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. त्यामुळे मतदारांच्या मतदानाच्या घटनात्मक अधिकारावर परिणाम झाल्याचे ठाकूर यांनी म्हटले आहे. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि निष्पक्षतेबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
“निवडणूक आयोगाने SIRच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे कमी केली. या प्रक्रियेमुळे भाजपला निवडणुकीत विजय मिळवून देण्यासाठी अप्रत्यक्ष मदत झाली,” असा आरोप राजाभाऊ ठाकूर यांनी केला.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवरही ठाकूर यांनी तीव्र आक्षेप घेतला. “ही कृती देशद्रोहाची असल्याचे आमचे मत असून, ज्ञानेश कुमार यांना पदावरून बडतर्फ करावे. तसेच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी त्यांनी केली.
SIR प्रक्रियेत वगळण्यात आलेल्या मतदारांची नावे, त्यामागील कारणे आणि संपूर्ण प्रक्रियेची पारदर्शकपणे चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही काँग्रेसकडून करण्यात आली आहे.