विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळणार हक्काचे व्यासपीठ


शाळांमध्ये रंगमंच उभारणीला प्राधान्य; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर

अलिबाग  (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या सुप्त कलागुणांना योग्य दिशा मिळावी तसेच त्यांच्यातील आत्मविश्वास वाढावा, यासाठी शाळांमध्ये आवश्यक त्या सुविधांसोबतच सांस्कृतिक उपक्रमांसाठी रंगमंच उभारण्यावर भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांना आपले कला-कौशल्य सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

शाळा म्हणजे केवळ शिक्षण देणारी संस्था नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे केंद्र आहे. अभ्यासाबरोबरच वक्तृत्व, अभिनय, गायन, नृत्य, संगीत, क्रीडा तसेच विविध सांस्कृतिक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होणे आवश्यक आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ होते आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला विविध पैलू प्राप्त होतात.

याबाबत वीज व बांधकाम समितीचे सभापती प्रशांत नाईक यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि आत्मविश्वासाला व्यासपीठ मिळावे, यासाठी या रंगमंचाची उभारणी केली जात आहे. शाळांच्या सुविधांसोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणे हीच आमची भूमिका आहे.”

शाळांमध्ये रंगमंच उपलब्ध झाल्याने विविध सांस्कृतिक कार्यक्रम, वक्तृत्व स्पर्धा, स्नेहसंमेलने, शैक्षणिक उपक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारांना अधिक चांगल्या पद्धतीने संधी मिळणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळावे, यासाठी अशा सुविधांची उभारणी महत्त्वाची ठरणार आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणाऱ्या सुविधांची निर्मिती करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. त्यामुळे शाळांमध्ये उभारण्यात येणारे हे रंगमंच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.