अंबेपुर मतदारसंघातील शिवसेनेच्या बैठकीत एकमुखी ठराव; जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांचा इशारा
अलिबाग (प्रतिनिधी ): ज्या पक्षाने कार्यकर्त्यांना मोठे केले, त्यांना राजकीय ओळख दिली आणि निवडणुकीत उमेदवारीची संधी दिली, त्या पक्षाशी प्रामाणिक राहणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पक्षात राहून गद्दारी करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही. अशा व्यक्तींची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, असा एकमुखी ठराव अंबेपुर मतदारसंघातील बैठकीत मंजूर करण्यात आला, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांनी दिली.
अंबेपुर मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पक्ष संघटना मजबूत करण्यासह आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचे आवाहन करण्यात आले.
“ज्या पक्षाने आपल्याला मोठे केले, निवडणुकीत उमेदवारी दिली आणि पक्षाच्या माध्यमातून राजकीय संधी उपलब्ध करून दिली, त्या पक्षाच्या पाठिशी कार्यकर्त्यांनी ठामपणे उभे राहिले पाहिजे. पक्षात राहून पक्षविरोधी भूमिका घेणे अथवा गद्दारी करणे खपवून घेतले जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा राजाभाई केणी यांनी दिला.
बैठकीत उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाशी निष्ठा राखण्याची भूमिका व्यक्त केली. पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या व्यक्तींवर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, असा एकमुखी ठराव संमत करण्यात आला. त्यामुळे या निर्णयाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
बैठकीत संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांमधील समन्वय आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची रणनीती यावरही चर्चा करण्यात आली. पक्षाची ताकद वाढविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.









