खारघर (प्रतिनिधी): खारघर सेक्टर १२ येथील कॅन्डीअर लाईफस्टाईल ज्वेलर्सच्या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी तब्बल १ कोटी ६४ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या चोरीत हिऱ्यांचे, सोन्याचे आणि प्लॅटिनमचे मौल्यवान दागिने तसेच कॅश काउंटरमधील रोकडही चोरट्यांनी चोरून नेली. या घटनेमुळे खारघर परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सेक्टर १२ मधील सीआयएसएफ रोडवरील उत्सव चौक परिसरातील साई कृपा प्रिमायसेस येथे कॅन्डीअर लाईफस्टाईल ज्वेलर्सचे दुकान आहे. १० ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास दुकान बंद करण्यात आले होते. त्यानंतर ११ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी कर्मचारी आल्यानंतर दुकानात चोरी झाल्याचे उघड झाले.
अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला आणि दागिन्यांच्या विभागातील मोठ्या प्रमाणातील मौल्यवान ऐवजावर हात साफ केला. चोरट्यांनी ६८ लाख ९१ हजार ७७९ रुपये किमतीचे हिऱ्यांचे १३९ दागिने, १५ लाख ५७ हजार ३७९ रुपये किमतीचे सोन्याचे २७ दागिने आणि ७९ लाख ५५ हजार ८१७ रुपये किमतीचे प्लॅटिनमचे ४८ दागिने चोरून नेले. याशिवाय कॅश काउंटरमधील ३० हजार रुपयांची रोकडही त्यांनी लंपास केली. एकूण २३४ दागिने आणि रोकड मिळून १ कोटी ६४ लाख ३४ हजार ९७६ रुपयांचा ऐवज चोरीला गेला.
घटनेची माहिती मिळताच खारघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथक आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांच्या मदतीने घटनास्थळाची तपासणी करण्यात आली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी फिर्यादी यांच्या तक्रारीवरून खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, सहायक पोलीस आयुक्त विक्रम कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जोशी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक साईप्रकाश चन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक तपास करत आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष भालेराव करीत आहेत.




