भरपावसात खळाळत्या पांडवकडा धबधब्यावर तरुण गेला आणि…


नवी मुंबई (प्रतिनिधी): नवी मुंबईच्या खारघरमधील पांडवकडा धबधब्यात पुन्हा एकदा एक गंभीर घटना घडली आहे. धबधब्याखाली एक तरुण पोहण्यास गेला आणि पाण्यात गुडूप झाल्याची माहिती मिळताच खारघर अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत थरारक शोधमोहीम सुरू केली. जोरदार पाऊस आणि धबधब्यातील वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक झाले होते. मात्र परिस्थितीची पर्वा न करता जवानांनी पाण्यात उतरून शोध घेतला.

धबधबा परिसरात पाण्याचा प्रवाह वेगाने सुरू असल्याने दोरीच्या सहाय्याने शोधमोहीम राबवण्यात आली. शोध घेत असताना दगडाच्या कपारीत तब्बल १० ते १२ फूट खोलवर तरुण  अडकलेल्या अवस्थेत आढळून आला. जवानांनी तातडीने त्याला बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर त्याला पाण्याबाहेर काढण्यात जवानांना यश आले. त्यानंतर त्याला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात रवाना करण्यात आले.

प्रशासन आणि पोलिसांकडून वारंवार सूचना देऊनही धोकादायक ठिकाणी जीव धोक्यात घालून पावसाळी पर्यटन करण्याचा अट्टहास सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.