अलिबाग (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी आणि भारतीय राष्ट्रध्वजाबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा-२०२६’ अभियानांतर्गत अलिबाग नगरपरिषदेच्या वतीने शुक्रवारी (१४ ऑगस्ट) तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अलिबाग शहरातून निघालेली रॅली मनामनात देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतावणारी ठरली.
अलिबाग नगरपरिषद कार्यालय परिसरातून सकाळी ९ वाजता रॅलीला सुरुवात झाली. हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने दुचाकीस्वार या रॅलीत सहभागी झाले होते. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा देशभक्तीपर घोषणांनी अलिबाग शहराचा परिसर दुमदुमून गेला.
रॅलीचा मार्ग अलिबाग नगरपरिषद कार्यालय, लिलॅक हॉटेल, अलिबाग बसस्थानक, महावीर चौक, ब्राह्मणआळी, श्रीराम मंदिर, नेने यांचे घर, युनियन बँक ऑफ इंडिया, जुने नगरपरिषद कार्यालय, बालाजी नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जुने मार्केट, जामा मशीद, मारुती नाका, पोस्ट ऑफिस मार्गे अलिबाग बीच असा होता. संपूर्ण शहरभर फिरून अलिबाग समुद्र किनारी रॅलीची सांगता करण्यात आली.
देशभक्तीपर गीतांची धून, हातात फडकणारे तिरंगा ध्वज, तरुणाईमध्ये सळसळणारा उत्साह यामुळे वातावरण भारावून गेले होते. भारत माता की जय, वन्दे मातरमच्या घोषणांनी अलिबाग शहर दणाणून गेले होते.
रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी रॅलीला आवर्जून उपस्थिती लावली. अलिबाग नगराध्यक्षा अक्षया नाईक, उपनगराध्यक्षा ॲड. मानसीताई म्हात्रे, नगरसेवक, नगरपरिषद कर्मचारी तसेच अलिबाग शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
राष्ट्रध्वजाचा सन्मान, देशभक्तीची भावना आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी ही तिरंगा बाईक रॅली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.









