अलिबाग (प्रतिनिधी) : “आपलं जीवन समाजासाठी समर्पित असलं पाहिजे. त्याचप्रमाणे मृत्यूनंतरही आपण समाजासाठी उपयोगी ठरणं हे खूप मोठं आणि महत्त्वाचं कार्य आहे. त्यामुळे प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प करून समाजाच्या हितासाठी पुढाकार घ्यावा,” असे प्रतिपादन डॉ. राजाराम हुलवान यांनी केले.
जागतिक अवयवदान दिनानिमित्त देहदान व अवयवदान प्रबोधन संस्था, रायगड यांच्या वतीने अलिबाग येथील जे.एस.एम. महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी ‘अवयवदान’ या विषयावर जनजागृतीपर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. राजाराम हुलवान बोलत होते. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी व युवक उपस्थित होते.
यावेळी डॉ. हुलवान यांनी अवयवदानाचे सामाजिक महत्त्व, त्यातून गरजू रुग्णांना मिळणारे जीवनदान आणि समाजात अवयवदानाबाबत निर्माण होणाऱ्या गैरसमजुती दूर करण्याची गरज याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मृत्यूनंतरही आपल्या अवयवांमुळे एखाद्या गरजू व्यक्तीला नवजीवन मिळू शकते. त्यामुळे अवयवदान हा मानवतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा सर्वोच्च आदर्श असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस देहदान व अवयवदान प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष गिरीश तुळपुळे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी संस्थेच्या माध्यमातून अवयवदान व देहदानाबाबत करण्यात येणाऱ्या जनजागृती उपक्रमांची माहिती दिली.
नेत्रतज्ज्ञ डॉ. शुभदा कुडतळकर यांनी कार्यक्रमाचा समारोप केला. त्यांनी अवयवदानाबाबत विद्यार्थ्यांनी अधिकाधिक जनजागृती करून समाजात सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचे आवाहन केले.
यावेळी डॉ. नितीन गांधी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, विद्यार्थी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये अवयवदानाबाबत जागरूकता निर्माण झाली.









