श्रीवर्धन (प्रतिनिधी): श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध आरावी समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेल्या पुणे येथील पर्यटकांचा अतिउत्साह चांगलाच अंगलट आला. समुद्रकिनाऱ्यावर वाहन नेऊ नये, तसेच समुद्र खवळलेला असल्याने पाण्यात उतरू नये, अशा स्पष्ट सूचना असतानाही पर्यटकांनी थेट समुद्रकिनाऱ्यावर भरतीच्या पाण्यात कार उतरवली. त्यानंतर कारच्या टपावर चढून सेल्फी काढणे आणि रील बनवण्यात ते दंग झाले. मात्र, याचवेळी समुद्राला भरती येत असल्याने पाणी हळूहळू कारच्या दिशेने सरकत होते.
दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास समुद्राला पूर्ण भरती येणार होती. मात्र, मोबाईलमध्ये सेल्फी आणि रील बनवण्यात मग्न असलेल्या पर्यटकांचे वाढत्या पाण्याकडे लक्षच गेले नाही. अवघ्या १५ ते २० मिनिटांत समुद्राचे पाणी कारखाली पोहोचले. परिस्थिती लक्षात आल्यानंतर पर्यटकांनी कार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाळूमध्ये कारची चाके गोल फिरू लागली आणि कार हळूहळू अधिकच रुतत गेली. भरती वाढत गेल्याने समुद्राचे पाणी कारमध्ये शिरले. त्यामुळे पर्यटकांची चांगलीच तारांबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने कार बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. अखेर जेसीबीच्या मदतीने कार समुद्राच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
केवळ सोशल मीडियासाठी सेल्फी आणि रील बनवण्याच्या नादात स्वतःचा जीव धोक्यात घालण्याबरोबरच अशा घटनांमुळे बचाव यंत्रणांवरही अनावश्यक ताण येतो. अशा पर्यटकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे.









