अलिबाग (प्रतिनिधी) : कुर्डूस ग्रामपंचायतीच्या हद्दीत भारताचा ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असतानाच ध्वजारोहणाच्या वेळी राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. याप्रकरणी संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कुर्डूस ग्रामपंचायतीतील नागरिकांनी रायगडच्या पोलीस अधीक्षकांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनानुसार, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी गावातील नागरिक तसेच शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात उपस्थित होते. सकाळी सुमारे ८ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू झाला. यावेळी ग्रामविकास अधिकारी मिलिंद सावंत यांनी राष्ट्रध्वज फडकविला. मात्र, ध्वजारोहण करताना राष्ट्रध्वज उलटा फडकविण्यात आल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले.
राष्ट्रध्वजाची ही स्थिती पाहून उपस्थित नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्याच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. मात्र, सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यानंतर राष्ट्रध्वज सरळ करून फडकविण्यात आला. मात्र, या प्रकारामुळे राष्ट्रध्वजाचा झालेला कथित अवमान भरून निघणार नसल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.
या घटनेमुळे उपस्थित नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली. स्वातंत्र्यदिनाच्या पवित्र कार्यक्रमात राष्ट्रध्वजासंदर्भात निष्काळजीपणा झाल्याने संबंधितांवर नियमाप्रमाणे कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत कुर्डूस ग्रामपंचायतीतील नागरिकांनी रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांकडे निवेदन सादर करून प्रकरणाची चौकशी करून संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली आहे. निवेदनाच्या प्रती पोयनाड पोलीस ठाण्याचे निरीक्षक, जिल्हाधिकारी रायगड, तसेच संबंधित जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात राष्ट्रध्वजाबाबत झालेल्या या प्रकाराची प्रशासनाकडून चौकशी होऊन नेमकी वस्तुस्थिती समोर येते का आणि संबंधितांवर काय कारवाई केली जाते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.









