अलिबाग (प्रतिनिधी): स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने 122 जिल्हा परिषद शाळांमध्ये आधुनिक व गुणवत्तापूर्ण इंग्रजी भाषा शिक्षणाला चालना देण्यासाठी इंग्रजी भाषा प्रयोगशाळांचे (English Language Learning Lab) लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमांतर्गत रायगड जिल्हा परिषद शाळा वरसोली येथील अत्याधुनिक इंग्रजी भाषा लॅबचे उद्घाटन रोजगार हमी योजना व फलोद्यान मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते संपन्न झाले.
या प्रसंगी मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जि.प. सदस्या मानसी दळवी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय नाईकडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) महारुद्र नाळे व इतर वरिष्ठ अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण, तंत्रज्ञानाधारित व स्पर्धात्मक करण्याच्या उद्देशाने एकूण 122 जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये इंग्रजी भाषा लॅब उभारण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यापैकी जिल्हा परिषद अर्थसंकल्प २०२५-२६ नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत 66 शाळांमध्ये तसेच जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत 56 शाळांमध्ये अशा प्रकारे जिल्ह्यात एकूण 122 शाळांमध्ये इंग्रजी भाषा लॅब उभारण्यात आली असून, त्यामध्ये रायगड जिल्हा परिषद शाळा वरसोलीचा समावेश आहे.
आजच्या डिजिटल युगात इंग्रजी ही केवळ एक भाषा नसून उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा, रोजगार आणि जागतिक ज्ञानव्यवस्थेकडे नेणारी महत्त्वाची कौशल्यभाषा बनली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक भाषा शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
उद्घाटनानंतर उपस्थितांना संबोधित करताना मंत्री भरतशेठ गोगावले यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षण सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. इंग्रजी भाषा लॅबमुळे विद्यार्थ्यांचे श्रवण, संभाषण, उच्चार, शब्दसंपदा आणि आत्मविश्वास यामध्ये लक्षणीय वाढ होऊन त्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक प्रगतीस चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, जिल्हा परिषद शाळांमध्ये उभारण्यात येत असलेल्या अशा आधुनिक सुविधा आणि शिक्षकांचे समर्पित प्रयत्न यांच्या बळावर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी खासगी शाळांतील विद्यार्थ्यांपेक्षाही अधिक सक्षम, आत्मविश्वासपूर्ण आणि स्पर्धात्मक बनतील.
मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी इंग्रजी भाषा लॅब प्रकल्पाची माहिती देताना सांगितले की, या लॅबमध्ये संगणक, हेडसेट, डिजिटल भाषा शिक्षण सॉफ्टवेअर, उच्चार सराव, श्रवण व संभाषण कौशल्य विकासासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना स्वयंगतीने सराव करण्याची संधी, योग्य उच्चारांचे मार्गदर्शन, संवादकौशल्य विकास आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षणाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून, या सुविधेमुळे जिल्हा परिषद शाळांमधील भाषा शिक्षण अधिक परिणामकारक होईल.
रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा इंग्रजी भाषा लॅब उपक्रम हा विद्यार्थ्यांमध्ये श्रवण, आकलन, संभाषण, उच्चार, शब्दसंपदा, आत्मविश्वास आणि डिजिटल शिक्षण कौशल्ये विकसित करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे. या मुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये आधुनिक भाषा शिक्षण सुविधा उपलब्ध होऊन शिक्षणाच्या गुणवत्तेत लक्षणीय वाढ होण्यास मदत होणार आहे.
Home ताज्या बातम्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 122 राजिप शाळांमध्ये अत्याधुनिक इंग्रजी भाषा लॅबचे लोकार्पण









