कोंदिवडेच्या खराब रस्त्याचा आवाज उठविणाऱ्या विद्यार्थिनींची राज ठाकरेंशी भेट


कर्जत (प्रतीनिधी) : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोंदिवडे येथील खराब रस्त्याचा प्रश्न शालेय विद्यार्थिनींनी आपल्या धाडसी रिपोर्टिंगच्या माध्यमातून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला होता. या विद्यार्थिनींनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

कोंदिवडे परिसरातील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने विद्यार्थी, ग्रामस्थ तसेच वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. पावसाळ्यात या समस्येत आणखी भर पडली होती. या परिस्थितीची दखल घेत शालेय विद्यार्थिनींनी खराब रस्त्याचे प्रत्यक्ष रिपोर्टिंग करून त्याचा व्हिडीओ तयार केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आणि प्रशासनाचे लक्ष या गंभीर समस्येकडे वेधले गेले.

विद्यार्थिनींच्या या प्रयत्नानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत कोंदिवडे येथील रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. त्यामुळे विद्यार्थिनींच्या धाडसी पत्रकारितेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान, या विद्यार्थिनींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी विद्यार्थिनींनी त्यांना रस्त्याच्या समस्येबाबत केलेल्या रिपोर्टिंगची माहिती दिली. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थिनींनी केलेल्या या प्रयत्नाचे राज ठाकरे यांनी कौतुक केले.

शालेय वयातच आपल्या परिसरातील मूलभूत समस्येवर आवाज उठवून प्रशासनाला काम करण्यास भाग पाडणाऱ्या या विद्यार्थिनींच्या उपक्रमामुळे ‘प्रश्न मांडला तर प्रशासनाची दखल घेतली जाते’ हा संदेश कोंदिवडे परिसरातून पुढे आला आहे.