हुकूमशाहीला मोडीत काढत भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री— पंडित पाटील


अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांची नियुक्ती झाल्यानंतर जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या नियुक्तीचे स्वागत करताना माजी आमदार पंडित पाटील यांनी भरत गोगावले यांच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करत त्यांचे कौतुक केले आहे.

“हुकूमशाहीला मोडीत काढत भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री झाले आहेत. त्यांच्या पालकमंत्रीपदाची मागणी सर्वप्रथम मीच केली होती,” असे पंडित पाटील यांनी सांगितले.

भरत गोगावले यांच्या राजकीय प्रवासाला स्थानिक पातळीपासून सुरुवात झाली. त्यांनी सर्वप्रथम सरपंच म्हणून काम केले. त्यानंतर पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि पुढे चार वेळा आमदार म्हणून त्यांनी जनतेचे प्रतिनिधित्व केले. आपल्या प्रदीर्घ राजकीय प्रवासात त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळत अखेर मंत्रिपदापर्यंत मजल मारली आणि आता रायगडच्या पालकमंत्रीपदाची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आहे.

पंडित पाटील यांनी सांगितले की, भरत गोगावले यांच्यासोबत काम करण्याचा आपल्याला अनुभव आहे. त्यांच्या राजकीय वाटचालीत श्रद्धा, सबुरी आणि सातत्य ही महत्त्वाची वैशिष्ट्ये राहिली आहेत. सामान्य जनतेशी जोडलेला नेता म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली असून, त्यामुळेच त्यांना रायगडचे पालकमंत्रीपद मिळणे हा जिल्ह्यासाठी महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी म्हटले.

“भरत गोगावले हे गरीब आणि सर्वसामान्यांचे नेते आहेत. संघर्षातून पुढे आलेल्या या नेतृत्वाला आता रायगडच्या विकासाची मोठी जबाबदारी मिळाली आहे,” असे पंडित पाटील यांनी नमूद केले.

गोगावले यांच्या पालकमंत्रीपदामुळे रायगड जिल्ह्यातील विकासकामांना अधिक गती मिळेल, तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य मिळेल, अशी अपेक्षाही पंडित पाटील यांनी व्यक्त केली.