भरत गोगावले यांच्या अलिबाग दौऱ्यात संजय पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट


अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर मंत्री भरत गोगावले यांनी बुधवारी अलिबाग येथे भेट दिली. यावेळी त्यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर प्रथमच अलिबाग येथे आलेल्या भरत गोगावले यांचे विविध स्तरातून स्वागत करण्यात आले. संजय पाटील यांच्या घरी झालेल्या या भेटीदरम्यान स्थानिक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी गोगावले यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले आणि पालकमंत्रीपदाच्या नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आस्वाद पाटील, भाजपचे अलिबाग तालुकाध्यक्ष रोशन भगत, निखिल चव्हाण, संतोष पालकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

रायगडच्या विकासासाठी पालकमंत्री म्हणून भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली विविध विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. या सदिच्छा भेटीमुळे स्थानिक राजकीय व सामाजिक क्षेत्रातही चर्चेला उधाण आले असून, पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर गोगावले यांच्या रायगड दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.