उरणमध्ये गुरे चोरट्यांचा पुन्हा सुळसुळाट ? चोरटे CCTV मध्ये कैद


उरण (प्रतिनिधी): उरण  तालुक्यात पुन्हा गुरे चोरणारी टोळी सक्रिय झाली असून, केळवणे येथे १८ ऑगस्ट रोजी पहाटे गुरे पळवून नेण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. पहाटे सव्वा चारच्या सुमारास काळ्या रंगाची झायलो गाडी संशयास्पदरीत्या परिसरात फिरताना दिसली.

मिळालेल्या माहितीनुसार, या गाडीतून एक व्यक्ती खाली उतरली आणि बसलेल्या गुरांजवळ जाऊन त्यांना इंजेक्शन देताना दिसली. त्यानंतर संबंधित व्यक्ती पुन्हा झायलो गाडीत बसून तेथून निघून गेली. मात्र, सुमारे १५ ते २० मिनिटांनंतर तीच गाडी पुन्हा त्याच ठिकाणी आली.

यावेळी गाडीतून चार जण खाली उतरले. इंजेक्शन दिल्यामुळे गुरे बेशुद्ध झाल्याचा संशय असून, त्यापैकी एका गुराला झायलो गाडीत टाकून पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, परिसरातील व्यक्तीला संशय आल्याने त्यांनी आरडाओरड केली. आवाज ऐकताच सर्वजण झायलो गाडीत बसून घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेमुळे केळवणे आणि परिसरातील शेतकरी व स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, उरण परिसरात यापूर्वीही गुरे चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. त्यावेळीही गुरांना बेशुद्ध करण्यासाठी इंजेक्शनचा वापर केला जात असल्याचेही समोर आले होते. या पार्श्वभूमीवर आता पुन्हा केळवणे येथे गुरे पळवून नेण्याचा प्रयत्न झाल्याने ‘उरणमध्ये गुरे चोरणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली आहे का?’ असा सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान, स्थानिक नागरिकांनी रात्रीच्या वेळी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, गुरे चोरी करणाऱ्या टोळीचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पोलिसांकडे केली जात आहे. परिसरातील CCTV फुटेजच्या आधारे संशयित झायलो गाडीचा शोध घेतला जात आहे.