रायगड (प्रतिनिधी): सद्भावना दिवसानिमित्त रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात एकता, बंधुता, शांतता आणि परस्पर सौहार्द जपण्याचा संदेश देत सद्भावना दिवसाची शपथ घेण्यात आली. पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार तसेच कार्यालयातील मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी सर्वांनी जात, धर्म, भाषा आणि प्रांत यांसारख्या भेदांपलीकडे जाऊन समाजात एकोपा व बंधुभाव टिकवून ठेवण्याचा संकल्प केला. विविधतेत एकता हीच भारतीय समाजाची खरी ताकद असून, परस्परांमध्ये विश्वास, आदर आणि सहकार्याची भावना वाढीस लागणे आवश्यक असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
समाजातील शांतता व सुव्यवस्था कायम राखताना सर्व घटकांमध्ये सौहार्दाचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असा निर्धारही करण्यात आला. सद्भावना दिवसाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, राष्ट्रीय एकात्मता आणि शांततेचा संदेश देण्यात आला.
“सद्भावनेतून एकता… एकतेतून सशक्त समाज!” या संदेशाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.









