आदर्श पतसंस्थेचे नाव बदलण्याचा ठराव वार्षिक सभेत मंजूर


अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबाग येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या नावात बदल करून संस्थेचे नामकरण ‘सुरेश पाटील आदर्श अर्बन को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लिमिटेड’ असे करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव संस्थेच्या २८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. सभासदांनी टाळ्यांच्या कडकडाटात या ठरावाचे स्वागत केले.

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेची २८वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (दि. २२) चेंढरे येथील पी.एन.पी. नाट्यगृहात आयोजित करण्यात आली होती. संस्थेचे अध्यक्ष अभिजीत सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. संस्थेचे संचालक अॅड. आत्माराम काटकर यांनी संस्थेच्या नामांतराचा ठराव मांडला. सभासदांनी तो एकमताने मंजूर केला.

याच सभेत रायगड जिल्ह्यातील नियोजित माणगाव शाखेसाठी तसेच पुणे येथील वारजे शाखेसाठी जागा खरेदी करण्याच्या ठरावालाही मंजुरी देण्यात आली. त्यामुळे संस्थेच्या विस्ताराला आणखी गती मिळणार आहे.

संस्थेच्या आर्थिक प्रगतीची माहिती देताना अध्यक्ष अभिजीत सुरेश पाटील यांनी सांगितले की, आदर्श पतसंस्थेचे सध्या ५८ हजार ८८६ सभासद असून संस्थेकडे ५९६ कोटी ८८ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. संस्थेने ४६० कोटी ७३ लाख रुपयांचे कर्जवाटप केले असून एकत्रित व्यवसाय १ हजार ५७ कोटी ६१ लाख रुपये झाला आहे. संस्थेला १५ कोटी ४१ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला असून ठेवींमध्ये ३७ टक्के, तर कर्जवाटपात ४५ टक्क्यांची वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, मागील एका वर्षात संस्थेने ३०४ कोटी रुपयांची विक्रमी व्यवसायवाढ नोंदवली असून अशी कामगिरी करणारी राज्यातील पहिली संस्था होण्याचा मान आदर्शला मिळाल्याचे संस्थापक सुरेश पाटील यांनी सांगितले. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात १ हजार ५०० कोटी रुपयांचा एकत्रित व्यवसाय, तर पुढील दोन वर्षांत २ हजार ५०० कोटी रुपयांचा एकत्रित व्यवसाय करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी जाहीर केले.

सभेपूर्वी सभासदांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे सल्लागार व बँकिंग तज्ज्ञ नितीन वाणी यांनी सभासदांना त्यांची कर्तव्ये, जबाबदाऱ्या आणि हक्क याबाबत मार्गदर्शन केले. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात आदर्श पतसंस्थेचा भक्कम पाया आणि संस्थापक सुरेश पाटील यांनी लावलेले रोपटे अध्यक्ष अभिजीत पाटील हे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कसे विस्तारत आहेत, याचा गौरव केला.

सभेच्या प्रारंभी देशासाठी शहीद झालेले जवान सुयोग अशोक कांबळे (मूळ गाव नारंगी) यांच्या वीरपत्नी निशा सुयोग कांबळे यांचा संस्थेतर्फे ऋणनिर्देश म्हणून शाल, श्रीफळ आणि ५१ हजार रुपयांचा धनादेश देऊन सन्मान करण्यात आला. तसेच वाघ्रण येथील कौस्तुभ मेहुल पाटील यांची हवाई दलात लढाऊ विमान वैमानिक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. कौस्तुभ सध्या कर्तव्यावर असल्याने त्यांच्या वतीने वडील मेहुल पाटील यांनी सन्मान स्वीकारला.

यावेळी शास्त्रज्ञ व संस्थेचे सभासद प्रदीप ताम्हाणे तसेच पुणे येथून सभेसाठी उपस्थित राहिलेल्या सभासदांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे कर्मचारी ऋतुराज पाटील, रेश्मा पाटील, निखिल पाटील, ग्रीष्मा सातामकर आणि ऐश्वर्या पाटील यांनी कस्टमर सर्व्हिस, बँकिंग कोड अँड स्टँडर्ड परीक्षेत यश मिळवल्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला.

आदर्श पतसंस्थेने आर्थिक विस्तारासोबतच सभासदांचे हित, आधुनिक बँकिंग तंत्रज्ञान आणि सामाजिक बांधिलकी यांना प्राधान्य देत वाटचाल सुरू ठेवली असून, आगामी काळात संस्थेच्या विस्ताराचे उद्दिष्ट अधिक व्यापक असल्याचे या वार्षिक सभेतून स्पष्ट झाले.