अलिबाग शहरातील प्रलंबित प्रश्नांसाठी आक्रमकपणे आवाज उठविण्याचा निर्धार


अलिबाग (प्रतिनिधी) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अलिबाग शहर पदाधिकारी व शिवसैनिकांची आढावा बैठक रविवार, दि. २३ रोजी अलिबाग शहरप्रमुख तथा अलिबाग नगरपालिका नगरसेवक ॲड. संदीप पालकर यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाली. आगामी काळात पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करून नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे संघर्ष करण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस नगरसेविका ॲड. श्वेता पालकर, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष बाबू सय्यद, उपशहर प्रमुख वसंत जैन, संपर्क प्रमुख मंगेश म्हात्रे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शाखाप्रमुख आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पक्षाच्या ‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र’ या अभियानाच्या अनुषंगाने अलिबाग शहरातील संघटनात्मक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. शहरातील विविध वॉर्डांमध्ये पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.

बैठकीदरम्यान अलिबाग शहरातील विविध वॉर्डांमधील प्रलंबित नागरी प्रश्न, नागरिकांच्या समस्या तसेच स्थानिक पातळीवरील विविध अडचणींचा आढावा घेण्यात आला. या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून ते सोडविण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून ठोसपणे आवाज उठविण्याचा निर्धार करण्यात आला. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देत त्यावर सातत्याने पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले.

शहरातील प्रत्येक वॉर्डात पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक सक्षम करण्यासाठी पदाधिकारी व शिवसैनिकांनी नागरिकांशी थेट संपर्क वाढवावा, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि त्या सोडविण्यासाठी प्रभावीपणे पाठपुरावा करावा, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.

आगामी काळात अलिबाग शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवून नागरिकांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करण्याचा निर्धार यावेळी पदाधिकारी व शिवसैनिकांनी व्यक्त केला.