अलिबाग(प्रतिनिधी) : यशोधन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, अलिबागने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात उल्लेखनीय आर्थिक कामगिरी नोंदवली असून संस्थेला ४९ लाख ४३ हजार ६६९ रुपये ६३ पैसे निव्वळ नफा झाला आहे. मागील वर्षाचा शिल्लक नफा ६ हजार ९६२ रुपये ३२ पैसे मिळून संस्थेकडे एकूण ४९ लाख ५० हजार ६३१ रुपये ९५ पैसे इतका नफा शिल्लक आहे. संस्थेच्या व्यवस्थापन समितीने या नफ्याच्या वाटपाचा प्रस्ताव तयार केला असून त्यास सभासदांनी मान्यता द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
प्रस्तावानुसार नफ्यातून राखीव निधीसाठी २५ टक्के रक्कम बाजूला ठेवण्यात आली आहे. त्यानंतर मागील वर्षाचा शिल्लक नफा विचारात घेऊन सभासदांना १२.५० टक्के लाभांश देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच संस्थेच्या भविष्यातील आर्थिक गरजा आणि विविध उपक्रमांसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आली आहे.
नफा वाटपाच्या प्रस्तावात इमारत निधीसाठी १० लाख रुपये, संशयित बुडीत कर्ज निधीसाठी ४ लाख ४० हजार रुपये, आकस्मिक निधीसाठी ४ लाख रुपये, निवडणूक खर्च निधीसाठी १ लाख रुपये, तसेच रोप्य महोत्सव खर्चासाठी २ लाख रुपये अशी तरतूद करण्यात आली आहे. या विविध तरतुदींनंतर संस्थेकडे २ हजार ५७० रुपये ९५ पैसे शिल्लक नफा राहणार असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, संस्थेचे सन २०२५-२६ चे शासकीय लेखापरीक्षण शासकीय लेखापरीक्षक ज्योत्स्ना उमेश पाटील यांनी पूर्ण केले आहे. लेखापरीक्षक क्रमांक १६५५५ बी-२ यांच्या मार्फत ७ ऑगस्ट २०२६ रोजी लेखापरीक्षण पूर्ण करण्यात आले असून संस्थेस ‘अ’ वर्ग प्राप्त झाला आहे. त्यामुळे संस्थेच्या आर्थिक शिस्तीवर आणि कारभारावर शिक्कामोर्तब झाले आहे.
संस्थेच्या प्रगतीत संचालक मंडळातील सदस्य, सहकारी कर्मचारीवर्ग, सहकार क्षेत्रातील मान्यवर तसेच रायगड जिल्हा महासंघ आणि महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याचे संस्थेने नमूद केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे संस्थेने सातत्याने प्रगती साधली असून भविष्यातही संस्थेची वाटचाल अधिक वेगाने सुरू राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
नफा वाटपाच्या या प्रस्तावाला सभासदांची मान्यता मिळाल्यानंतर लाभांश वितरणासह विविध निधींची तरतूद प्रत्यक्षात येणार आहे. आर्थिक शिस्त, सभासदांचा विश्वास आणि संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रगतीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा नफा संस्थेसाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
रायगड जिल्हा महासंघाचे अध्यक्ष जे.टी.पाटील रायगड जिल्हा महासंघाचे सचिव योगेश मगर हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
पतसंस्थेच अध्यक्ष चंद्रशेखर वागळे यांनी सभासदाना मार्गदर्शन केले. संचालक मंडळ व कर्मचाऱ्यावर पिग्मी एजंट उपस्थित होते.









