अलिबाग तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची नवीन कार्यकारणी जाहीर


शैक्षणिक विकासासाठी आवश्यक सुधारणा करण्याचा नवनिर्वाचित कार्यकारिणीचा मानस

अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबाग तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची नवीन कार्यकारणी निवडण्यासाठी संस्थेची सभा गुरुवार, दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी शिशूविहार, अलिबाग येथे उत्साहात संपन्न झाली. या सभेत संस्थेच्या पुढील कार्यकाळासाठी नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली.

अलिबाग तालुका शिक्षण प्रसारक मंडळ ही सन १९३८ मध्ये स्थापन झालेली अलिबाग तालुक्यातील जुनी व शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारी संस्था आहे. संस्थेच्या माध्यमातून अलिबाग तालुक्यात अलिबाग, लोणारे, भाल, जांभुळपाडा, कार्ले, पवेळे, वढाव, उसर आणि चौल भोवाळे या ठिकाणी एकूण नऊ शाळा कार्यरत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने कार्य करत या शाळांचा विकास साधला आहे.

नवीन कार्यकारणीत अध्यक्षपदी ॲड. किरण कोसमकर, उपाध्यक्षपदी श्री. जगदीश पाटील, खजिनदारपदी सौ. शोभा जोशी, तर सचिवपदी श्री. दत्तात्रेय माळवी यांची निवड करण्यात आली.

कार्यकारिणीच्या सभासदपदी श्री. बळवंत वालेकर, ॲड. प्रसाद पाटील, ॲड. प्रविण ठाकूर, श्री. सुकुमार भगत, श्री. काशिनाथ थळे आणि श्रीमती सुषमा सोमण यांची निवड झाली.

नवनिर्वाचित कार्यकारिणीने संस्थेच्या शैक्षणिक विकासाला अधिक चालना देण्याचा निर्धार व्यक्त केला. विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे, शाळांच्या आवश्यक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे तसेच बदलत्या शैक्षणिक गरजांनुसार संस्थेच्या कामकाजात आवश्यक सुधारणा करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

संस्थेच्या प्रदीर्घ शैक्षणिक परंपरेला पुढे नेत विद्यार्थी, शिक्षक आणि शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा मानस नवनिर्वाचित कार्यकारिणीने व्यक्त केला.