ताम्हिणी घाटातील बेवारस महिलेच्या हत्येचे गूढ उकलले; २४ तासांत दोन संशयित ताब्यात


माणगाव (प्रतिनिधी) : माणगाव-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटातील कोडेखर गावाच्या हद्दीत दरीत बेवारस अवस्थेत आढळलेल्या महिलेच्या हत्येचे गूढ अखेर उकलण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे. महिलेची ओळख पटवून अवघ्या २४ तासांत दोन संशयित आरोपींना पिंपरी-चिंचवड परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तांत्रिक तपासाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

दरीत मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत महिलेची ओळख पटविण्याचे आव्हान प्रथम पूर्ण केले. तपासादरम्यान मृत महिला सुमन गोपाळ यादव (रा. पिसोली, पुणे) असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी विविध दिशांनी तपास सुरू करून संशयितांचा माग काढला.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, सुमन यादव यांना फिरण्याच्या बहाण्याने ताम्हिणी घाटात आणण्यात आले होते. त्यानंतर ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून त्यांची हत्या करण्यात आली. हत्येनंतर मृतदेह ताम्हिणी घाटातील दरीत फेकून देण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

या प्रकरणी दुर्गाप्रसाद प्रजापती आणि दिनेशकुमार प्रजापती या दोघांना पिंपरी-चिंचवड परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तांत्रिक तपासाच्या माध्यमातून संशयितांचा माग काढत ही कारवाई केली.

दरम्यान, या हत्येमागील नेमका हेतू काय होता, आरोपी आणि मृत महिलेचे संबंध काय होते, तसेच हत्येपूर्वी आणि हत्येनंतर नेमके काय घडले, याचा तपास माणगाव पोलिसांकडून सुरू आहे. दोन्ही संशयितांकडून चौकशी केल्यानंतर या प्रकरणातील आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

ताम्हिणी घाटातील दरीत महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांनी वेगाने तपास करत अवघ्या २४ तासांत महिलेची ओळख पटवून संशयितांना ताब्यात घेतल्याने या हत्याकांडाच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे.