सिव्हिल रुग्णालयाच्या प्रश्नांवरून राजकारण तापले; आमदार महेंद्र दळवी आणि पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्यावरील वक्तव्यांचा शिवसेनेकडून निषेध
अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रश्नांवरून शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर केलेल्या टीकेला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजा केनी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. रुग्णालयातील प्रश्नांवर चर्चा करण्याच्या नावाखाली आमदार महेंद्र दळवी आणि विद्यमान पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्याविरोधात करण्यात आलेल्या वक्तव्यांचा तीव्र निषेध करत, “जनतेने ज्यांना राजकीयदृष्ट्या नाकारले आहे, त्यांनी सत्ताधाऱ्यांना राजकारणाचे धडे देण्याची गरज नाही,” असा टोला केनी यांनी लगावला.
राजा केनी म्हणाले की, रुग्णालयातील प्रश्न गंभीर असतील तर त्यावर प्रशासनाकडून उत्तर मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नांना राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे व्यासपीठ बनवणे योग्य नाही. सिव्हिल रुग्णालयाच्या विकासासाठी शासनाकडून होणाऱ्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष करून केवळ प्रसिद्धीसाठी आंदोलनाचे राजकारण करणे जनतेला मान्य होणार नाही.
‘आधी स्वतःचा राजकीय हिशोब तपासा’
चित्रलेखा पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर प्रश्न उपस्थित करण्यापूर्वी आपल्या पक्षाचा राजकीय हिशोब तपासावा, असा घणाघात राजा केनी यांनी केला.
“जिल्हा परिषद निवडणुकीत जनतेने शेकापला किती साथ दिली, हे जनतेसमोर आहे. जिल्हा परिषदेत शेकापचा एकही सदस्य निवडून आला नाही. हा केवळ निवडणुकीतील पराभव नसून जनतेने त्यांच्या राजकारणाला दिलेला स्पष्ट नकार आहे. त्यामुळे ज्यांना जनतेने राजकीय मैदानाबाहेर केले, त्यांनी आता जनतेच्या नावाने सत्ताधाऱ्यांना शिकवण देण्यापूर्वी आत्मपरीक्षण करावे,” असा सवाल केनी यांनी केला.
‘दळवी आणि गोगावले यांच्यावर टीका सहन केली जाणार नाही’
आमदार महेंद्र दळवी आणि पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या कार्यपद्धतीवर करण्यात आलेल्या वैयक्तिक स्वरूपाच्या टीकेचाही राजा केनी यांनी निषेध केला.
“रायगडच्या विकासासाठी आमदार महेंद्र दळवी आणि पालकमंत्री भरतशेठ गोगावले काम करत आहेत. विकासकामे, निधी आणि प्रशासकीय प्रश्नांवर मतभेद असू शकतात; मात्र वैयक्तिक आरोप करून राजकीय वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न शिवसैनिक कदापि सहन करणार नाहीत. टीका करायची असेल तर ती मुद्द्यांवर करा, पुराव्यांसह करा,” असे केनी यांनी सुनावले.
‘रुग्णालयाच्या प्रश्नांवर राजकारण नको’
सिव्हिल रुग्णालयात मनुष्यबळ, सुरक्षा, विद्युत व्यवस्था आणि इमारतीच्या दुरुस्तीचे प्रश्न असतील तर ते प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणे आवश्यक आहे. मात्र या प्रश्नांचे राजकीय श्रेय घेण्यापेक्षा त्यावर कायमस्वरूपी तोडगा कसा निघेल, यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे, असेही केनी यांनी स्पष्ट केले.
“रुग्णालय कोणत्याही एका पक्षाचे नाही; ते रायगडच्या जनतेचे आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या नावावर राजकीय दुकानदारी चालवण्यापेक्षा प्रत्यक्ष उपाययोजनांसाठी पुढे या. शासनाने केलेल्या कामांची माहिती घेऊन मग आरोप करा,” असा सल्लाही त्यांनी दिला.
‘जनता सर्व पाहत आहे’
निवडणुकीच्या काळात जनतेसमोर जाऊन विकासाचे आश्वासन देणारे आणि निवडणुकीनंतर जनतेने नाकारलेले राजकीय चेहरे पुन्हा आंदोलनांच्या माध्यमातून स्वतःचे अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही राजा केनी यांनी केला.
“जनता हुशार आहे. कोण काम करतो आणि कोण केवळ प्रसिद्धीसाठी आंदोलन करतो, हे जनतेला चांगलेच कळते. निवडणुकीत जनतेने दिलेला कौल हा अंतिम असतो. त्या कौलाचा आदर करण्याऐवजी पुन्हा पुन्हा सत्ताधाऱ्यांवर आरोप करून राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करू नये,” असा इशारा केनी यांनी दिला.
‘शेकापने आत्मपरीक्षण करावे’
रायगडच्या जनतेने विकासाच्या राजकारणाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे जुन्या आंदोलनाच्या राजकारणाच्या जोरावर जनतेची दिशाभूल करता येणार नाही. शेकापने सत्ताधाऱ्यांवर आरोप करण्यापेक्षा आपल्या पक्षाची संघटनात्मक स्थिती आणि निवडणुकीतील कामगिरी याचे आत्मपरीक्षण करावे, असेही राजा केनी यांनी म्हटले.
“रायगडच्या जनतेने ज्यांना नाकारले आहे, त्यांनी आधी जनतेचा कौल स्वीकारावा. त्यानंतरच इतरांना राजकारणाचे धडे द्यावेत,” असा थेट टोला राजा केनी यांनी चित्रलेखा पाटील यांना लगावला.
दरम्यान, सिव्हिल रुग्णालयाच्या प्रश्नावरून शेकाप आणि शिवसेना यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे असून, आगामी काळात या मुद्द्यावरून रायगडच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांची धार वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे









