आमदार प्रमोद जठार यांच्या पाठपुराव्याला यश; हिंदू-वाणी, हिंदू-वैश्य आणि हिंदू-वैश्यवाणी जातींचा समावेश स्पष्ट
मुंबई (प्रतिनिधी) : वैश्यवाणी समाजाच्या हक्काच्या OBC लाभांसाठी आमदार प्रमोद जठार यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर सकारात्मक यश मिळाले आहे. शासनाने यासंदर्भात घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे वैश्यवाणी समाजातील विद्यार्थी, युवक तसेच पात्र लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे शिक्षण, रोजगार आणि शासनाच्या विविध OBC सवलती व योजनांचा लाभ मिळविण्याचा मार्ग अधिक सुलभ होणार आहे.
शासनाच्या निर्णयानुसार हिंदू-वाणी, हिंदू-वैश्य आणि हिंदू-वैश्यवाणी या तीनही जातींचा समावेश वैश्यवाणी या जातीत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. उपलब्ध जुन्या दस्तऐवजांमध्ये संबंधित नोंदी आढळून आल्यास पात्र व्यक्तींना वैश्यवाणी जातीचे जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत.
या निर्णयामुळे वैश्यवाणी समाजातील पात्र व्यक्तींना OBC प्रवर्गातून मिळणाऱ्या विविध शासकीय सवलतींचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या अडचणी कमी होण्याची शक्यता आहे. विशेषतः विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शिष्यवृत्ती, प्रवेशातील आरक्षण तसेच युवकांना रोजगार आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, या निर्णयाचे वैश्यवाणी समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. वैश्यवाणी OBC कृती समितीचे अध्यक्ष सुनील खाडये यांनी महायुती सरकारचे अभिनंदन करताना आमदार प्रमोद जठार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे विशेष कौतुक केले.
“वैश्यवाणी समाजाच्या हक्काचे OBC लाभ मिळवून देण्यासाठी आमदार प्रमोद जठार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. शासनाने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे समाजातील विद्यार्थी, युवक आणि पात्र लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल महायुती सरकारचे हार्दिक अभिनंदन असून, वैश्य समाजासाठी कायमस्वरूपी सुरू असलेल्या पाठपुराव्याबद्दल आमदार प्रमोद जठार यांचे मनःपूर्वक आभार,” असे सुनील खाडये यांनी सांगितले.
शासनाच्या या निर्णयामुळे वैश्यवाणी समाजातील पात्र लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया अधिक स्पष्ट होण्यास मदत होणार असून, OBC प्रवर्गातील हक्काचे लाभ मिळण्याचा मार्गही सुकर होणार आहे.









