धोकादायक पुलावर काचेच्या पट्ट्या; सुरक्षेच्या चाचपणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
नागोठणे (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणे येथील धोकादायक ठरलेला उड्डाण पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पुलाच्या सुरक्षिततेबाबत विविध स्तरांवर तपासणी आणि तांत्रिक चाचण्या सुरू असतानाच पुलाच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींवर काचेच्या पट्ट्या बसविण्याचे काम सुरू असल्याचे समोर आले आहे. या कामाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुलाच्या सुरक्षिततेबाबत चर्चेला उधाण आले आहे.
पुलाच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींवर असलेल्या पॅनलला एम.एस. (माइल्ड स्टील)च्या सहाय्याने काचेच्या पट्ट्या लावण्यात येत आहेत. या काचेच्या पट्ट्यांचा नेमका उद्देश काय, त्यातून पुलाच्या संरचनात्मक सुरक्षिततेची चाचणी कशी केली जाणार आणि या प्रक्रियेमुळे पुलाच्या सुरक्षिततेबाबत कोणता निष्कर्ष काढला जाणार, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
पूल आधीच धोकादायक स्थितीत असल्याने तो वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत पुलावर काचेच्या पट्ट्या बसविल्याचा व्हिडिओ समोर आल्याने ‘काचेच्या पट्ट्यांनी पूल सुरक्षित होणार का?’ असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे. पुलाच्या दुरुस्तीबरोबरच त्याची संरचनात्मक क्षमता आणि भविष्यातील वाहतुकीसाठीची सुरक्षितता याबाबत ठोस निर्णय घेण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माहितीनुसार पुलाच्या सुरक्षिततेची तांत्रिक चाचपणी सुरू असून, पुलाच्या प्रभावित भागातील स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी विविध उपकरणे आणि निरीक्षणाच्या माध्यमांचा वापर केला जात आहे. पुलाच्या संरचनेतील हालचाली, दुरुस्तीचा परिणाम आणि पुलाची एकूण सक्षमता यांचा अभ्यास करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
पुलाची सुरक्षितता तपासण्याच्या या प्रक्रियेत काचेच्या पट्ट्यांचा वापर नेमका कोणत्या तांत्रिक कारणासाठी केला जात आहे, याबाबत अधिकृत स्पष्टीकरण मिळणे आवश्यक आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाचा दुवा असलेल्या या पुलाची सुरक्षितता ही हजारो वाहनचालकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याने, चाचणीचा अंतिम अहवाल आणि पुलाच्या दुरुस्तीबाबतची पुढील कार्यवाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









