गणेशोत्सवातील चलचित्र देखावे लोप पावताना; बदलत्या जीवनशैलीचा परिणाम


अलिबाग (प्रतिनिधी) : एकेकाळी सार्वजनिक गणेशोत्सव म्हटला की गणरायाच्या दर्शनासोबतच मंडळांनी साकारलेले आकर्षक चलचित्र देखावे पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असे. सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक तसेच प्रबोधनात्मक विषयांवर आधारित चलचित्रांच्या माध्यमातून मंडळे जनजागृतीचा संदेश देत असत. मात्र, बदलती जीवनशैली, वाढती धावपळ आणि मंडळांच्या सदस्यांना वेळेअभावी आता हे पारंपरिक चलचित्र देखावे हळूहळू लोप पावत आहेत.
पूर्वी गणेशोत्सवाच्या काही दिवस आधीपासूनच सार्वजनिक गणेश मंडळांचे कार्यकर्ते एकत्र येऊन चलचित्र देखाव्याची तयारी करीत असत. देखाव्यासाठी लागणारी सजावट, प्रकाशयोजना, संवाद, अभिनय तसेच अन्य कामे मंडळाचे सदस्य स्वतःच सांभाळत. त्यामुळे गणेशोत्सवात मनोरंजनासोबतच सामाजिक आणि प्रबोधनात्मक संदेश देणारे देखावे सादर केले जात.
मात्र, सध्याच्या काळात बहुतांश मंडळांचे सदस्य नोकरी, व्यवसाय आणि अन्य कामधंद्यांमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे एकत्र येऊन अनेक दिवस तयारी करण्यासाठी आवश्यक वेळ मिळत नाही. चलचित्र देखावा उभारण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, वेळ आणि नियोजनाची गरज असते. या तिन्ही बाबींची कमतरता जाणवत असल्याने अनेक मंडळांना इच्छा असूनही चलचित्र देखावे साकारता येत नसल्याचे चित्र आहे.
“पूर्वी सार्वजनिक गणेश मंडळातील सदस्य एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने चलचित्र देखावे सादर करीत होते. त्यासाठी मंडळातील प्रत्येक जण आपापली जबाबदारी पार पाडत असे. आता बहुतांश सदस्य कामधंद्यात गुंतले असल्याने एकत्र येण्यासाठी वेळ मिळत नाही. चलचित्र बनविण्यासाठी वेळ आणि माणसांची आवश्यकता असते. या दोन्हींची कमतरता असल्याने आता असे देखावे कमी होत चालले आहेत,” अशी खंत आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष रवी आंबेकर यांनी व्यक्त केली.
एकेकाळी गणेशोत्सवाची ओळख असलेली ही चलचित्र देखाव्यांची परंपरा पुढील पिढीपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी मंडळांनी नव्या तंत्रज्ञानाचा आणि आधुनिक माध्यमांचा वापर करण्याची गरज व्यक्त होत आहे.