विश्व हिंदू रक्षा परिषदेत अमरजित जयनारायण पांडे यांच्यावर राष्ट्रीय महामंत्रीपदाची धुरा


राष्ट्रहित व सामाजिक कार्याची दखल; संघटन विस्ताराची महत्त्वाची जबाबदारी

रायगड (अमुलकुमार जैन): विश्व हिंदू रक्षा परिषदेकडून अमरजित जयनारायण पांडे यांची भारताचे राष्ट्रीय महामंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रहित तसेच सनातन समाजाच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.

विश्व हिंदू रक्षा परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष गोपाल राय यांच्या निर्देशानुसार अमरजित जयनारायण पांडे यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्याला चालना देणे, संघटनेचा विस्तार करणे तसेच विविध स्तरांवरील पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधणे, अशी जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

नियुक्तीपत्रानुसार, अमरजित जयनारायण पांडे यांनी संघटनेच्या कार्याचा नियमित आढावा घेऊन त्याची माहिती लखनऊ येथील मुख्यालयाला देणे अपेक्षित आहे. नियुक्तीच्या तारखेपासून एका महिन्याच्या आत त्यांनी केलेल्या संघटनात्मक कार्याचा अहवाल मुख्यालयाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दर महिन्याच्या पहिल्या रविवारी होणाऱ्या आढावा बैठकीला राष्ट्रीय, प्रदेश आणि जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचेही नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे. सलग दोन बैठकींना अनुपस्थित राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर संघटनेच्या नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

संघटनेचा विस्तार करण्यासाठी नवीन पदाधिकारी व सदस्य जोडण्यावर भर देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपली जबाबदारी सक्रियपणे पार पाडून संघटनेच्या कार्याला बळकटी देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

अमरजित जयनारायण पांडे यांच्या नियुक्तीमुळे संघटनेच्या कार्याला अधिक चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नियुक्तीपत्रात त्यांना सोपविण्यात आलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून संघटनेच्या उद्दिष्टांसाठी कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.