म्हात्रोळी (प्रतिनिधी) : रायगड जिल्हा परिषद सदस्य तथा प्रतोद अमितदादा नाईक यांच्या पुढाकाराने म्हात्रोळी येथील हनुमान मंदिर ते संजय पाटील यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या कामाचा शुभारंभ अमितदादा नाईक यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
गावातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, पावसाळ्यात निर्माण होणारा चिखल तसेच नागरिकांना ये-जा करताना होणारी गैरसोय लक्षात घेऊन या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची मागणी करण्यात आली होती. या मागणीचा पाठपुरावा करून अमितदादा नाईक यांनी रस्त्याच्या कामासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे ग्रामस्थांना आता बारमाही वाहतुकीसाठी अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित रस्ता उपलब्ध होणार आहे.
शुभारंभप्रसंगी अमितदादा नाईक यांनी विकासकामे ही केवळ आश्वासनांपुरती मर्यादित न ठेवता ती प्रत्यक्षात पूर्ण करण्यावर भर देण्यात येत असल्याचे सांगितले. गावातील नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि स्थानिक विकासकामांना प्राधान्य देत पुढील काळातही आवश्यक कामांसाठी पाठपुरावा केला जाईल, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.
या वेळी गावातील सर्व नागरिक, ज्येष्ठ ग्रामस्थ तसेच स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत अमितदादा नाईक यांचे आभार मानले.









