६२ हजार ८२३ सभासदांचा संस्थेवर विश्वास
संस्थेने आर्थिक प्रगतीत उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. संस्थेकडे ६४० कोटी ७१ लाख रुपयांच्या ठेवी असून ५३६ कोटी १५ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. संस्थेचा एकत्रित व्यवसाय १२०६ कोटी १० लाख रुपयांवर पोहोचला आहे.
संस्थेचा सीडी रेशो ८३.०४ टक्के असून १८८ कोटी ६८ लाख रुपयांची गुंतवणूक आहे. एकूण कर्जापैकी २०५ कोटी रुपयांचे सोनेतारण कर्ज आहे. विशेष म्हणजे संस्थेचे नेट एनपीए प्रमाण शून्य टक्के असून ६२ हजार ८२३ सभासदांचा संस्थेवर विश्वास लाभला आहे.
लहान मुलांमध्ये बचतीची सवय रुजविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘अनन्या बचत खाते’ योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेअंतर्गत १३ हजार ४१७ खाती उघडण्यात आली असून त्यामध्ये ५ कोटी ७० लाख रुपयांची बचत जमा झाली आहे.
महिला सक्षमीकरणालाही संस्थेने प्राधान्य दिले असून संस्थेतील सुमारे ४० टक्के कर्मचारी महिला आहेत. महिला कर्मचाऱ्यांना संधी देत संस्थेने सहकार क्षेत्रात महिला सहभागाचा आदर्श निर्माण केला आहे.
गरजू रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध
आर्थिक व्यवहाराबरोबर सामाजिक बांधिलकी जपण्यातही संस्थेने पुढाकार घेतला आहे. संस्थेमार्फत आतापर्यंत एक हजारांहून अधिक रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमांना मदत, नैसर्गिक आपत्तीच्या काळात शासनाला सहाय्यता निधी, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना पालकत्व, शाळा आणि रुग्णालयांना आर्थिक मदत असे विविध उपक्रम संस्थेकडून राबविण्यात येतात. वर्षातून दोन वेळा रक्तदान शिबिरांचे आयोजन करून जमा झालेल्या रक्तदान कार्डांच्या माध्यमातून गरजूंना मोफत रक्त उपलब्ध करून दिले जाते.
पहिला ‘सहकार भूषण’ पुरस्कार मिळाला होता
या आधी संस्थेला ‘सहकार भूषण’ पुरस्कार मिळाला होता. दैनिक नवराष्ट्रच्या या सहकार परिषदेत राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, महाराष्ट्र गृहनिर्माणचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, आमदार अभिजित पाटील, संपादक संजय मल्ले, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ काळे आणि ओंकार शुगरचे संचालक ओमराजे बोने-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या पुरस्कार सोहळ्यावेळी आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील, महाव्यवस्थापक उमेश पाटील, संचालक विलास तांडेल, तज्ज्ञ संचालक तथा सनदी लेखापाल संजय राऊत, डॉ. मकरंद आठवले , संचालक योगेश विरकूड आदी उपस्थित होते. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक सेवा देतानाच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्याचा या पुरस्काराने गौरव झाला आहे.







