संविधान दिनानिमित्त विधी महाविद्यालयात अमली पदार्थविरोधी जनजागृती व सायबर सुरक्षेवर मार्गदर्शन


नशामुक्त युवा, विकसित भारत २०४७चा संकल्प; संविधानिक मूल्ये, नागरिकांची कर्तव्ये आणि युवकांच्या सामाजिक सहभागावर मान्यवरांचे मार्गदर्शन

अलिबाग (प्रतिनिधी) : संविधान दिन २०२६ निमित्त ‘नशामुक्त युवा, विकसित भारत २०४७’ या संकल्पनेतून मेरा युवा भारत, अलिबाग–रायगड (युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, भारत सरकार) आणि जनता शिक्षण मंडळाचे ॲड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉ, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने, प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग यांच्या सहकार्याने अमली पदार्थविरोधी जनजागृती व सायबर सुरक्षा या विषयांवर विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी संविधानिक मूल्ये, नागरिकांची कर्तव्ये, युवकांचा सामाजिक सहभाग, अमली पदार्थांचे दुष्परिणाम तसेच सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्याच्या उपाययोजनांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी अमली पदार्थांची वाढती उपलब्धता, सेवन आणि त्यातून उद्भवणाऱ्या गुन्हेगारीविषयी चिंता व्यक्त केली. तरुणांनी अमली पदार्थांपासून स्वतःला दूर ठेवण्यासोबतच मित्रपरिवार आणि समाजातील इतरांनाही व्यसनांपासून परावृत्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. अमली पदार्थांची तस्करी अथवा संशयास्पद हालचाली आढळल्यास पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून घडणाऱ्या सायबर गुन्ह्यांचे स्वरूप स्पष्ट करत डिजिटल व्यवहार, ऑनलाइन संवाद आणि सोशल मीडिया वापरताना सुरक्षिततेच्या उपाययोजना व सतर्कता बाळगण्याचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.

विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. नीलम हजारे यांनी सादरीकरणाद्वारे अमली पदार्थांचे प्रकार, त्यांची निर्मिती तसेच भारतात आयात व वितरण होणाऱ्या मार्गांची माहिती दिली. युवा पिढी व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत, विकसित भारताच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तरुणांनी अमली पदार्थांविरोधात जनजागृती करण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे त्यांनी प्रतिपादन केले.

स्पर्धा विश्व अकॅडमीच्या संचालिका तथा स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा सुचिता साळवी यांनी भारताच्या युवा शक्तीचे महत्त्व अधोरेखित केले. विकसित भारत २०४७चे स्वप्न साकार करण्यासाठी नशामुक्त, सक्षम आणि जबाबदार युवा पिढी घडवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. व्यसनाधीनतेमुळे युवकांची क्षमता, ऊर्जा आणि देशाच्या विकासातील योगदान बाधित होत असल्याने तरुणांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी समाजाने एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार व कर्तव्यांचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांकडून संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून घेतले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी, भारत सरकार तथा प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी नंदकुमार गोंधळी यांनी केले. त्यांनी नशामुक्ती विषयावरील ध्वनीचित्रफीत सादर करून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शनही केले.
यावेळी जे.एस.एम. कॉलेजच्या प्राचार्या सोनाली पाटील, मेरा युवा भारत अलिबाग–रायगडचे प्रतिनिधी जयेश म्हात्रे व अनुष्का रामनाथकर, बार्टी समतादूत अनुजा पाटील, स्पर्धा विश्व अकॅडमीच्या प्रतिनिधी महिमा शिपाई व श्रेया म्हात्रे उपस्थित होते. नॅक समन्वयक प्रा. नीलम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाच्या समन्वयाची जबाबदारी डी.एल.एल.ई. विभागप्रमुख प्रा. कौशिक बोडस, प्रा. सूरज पुरी आणि लिगल एड सेल प्रमुख प्रा. चिन्मय राणे यांनी पार पाडली. यावेळी प्रा. डॉ. संदीप घाडगे, प्रा. पियुषा पाटील, प्रा. स्वराली साईकर, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संविधान दिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून युवकांमध्ये संविधानिक जाणिवा, सामाजिक जबाबदारी, नशामुक्त जीवनशैली आणि सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला. नशामुक्त आणि सजग युवकांच्या सहभागातूनच विकसित भारत २०४७चे ध्येय साध्य होऊ शकते, असा आशय या कार्यक्रमातून अधोरेखित करण्यात आला.