अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यातील मल्याण फाटा येथे शासकीय रुग्णवाहिकेने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हेमंत दामोदर पाटील (वय ५०, रा. चिंचोटी, ता. अलिबाग) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना शनिवारी (दि. २८ नोव्हेंबर) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शासकीय १०८ रुग्णवाहिकेचा चालक मयूर पाटील (रा. कुरुळ, ता. अलिबाग) हा मल्याण फाटा येथून भरधाव वेगाने रुग्णवाहिका चालवत जात होता. यावेळी त्याने समोरून येणाऱ्या हेमंत पाटील यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात हेमंत पाटील गंभीर जखमी झाले. अपघातानंतर रुग्णवाहिका चालकाने त्यांना त्याच रुग्णवाहिकेतून अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णवाहिका चालकाला ताब्यात घेतले असून, त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती समजल्यानंतर जिल्हा रुग्णालयात मृताच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. रुग्णालयात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.









