सांबारकुंड धरणग्रस्तांना बाजारभावानुसार मोबदला, उसर प्रकल्पग्रस्तांना रोजगार आणि जिल्हा रुग्णालयात CT Scan व MRI सुविधा अखंड सुरू ठेवण्याचीही मागणी
अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबाग-वडखळ रस्त्यावरील वाढती वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि प्रवासी व स्थानिक नागरिकांना सहन करावा लागणारा त्रास लक्षात घेता या मार्गाच्या 17 किलोमीटर रस्त्याचे चौपदरीकरण तातडीने करण्याची मागणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अॅड. महेश मोहिते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अलिबागच्या वाहतूक व्यवस्थेसह पर्यटन आणि विकासाला चालना देण्यासाठी या रस्त्याचे चौपदरीकरण आवश्यक असल्याचे त्यांनी निवेदनात अधोरेखित केले आहे. यासोबतच सांबारकुंड धरणग्रस्तांना बाजारभावानुसार मोबदला, उसर येथील गेल इंडिया प्रकल्पात स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगार व CSR सुविधांमध्ये प्राधान्य आणि अलिबाग जिल्हा रुग्णालयातील CT Scan व MRI सुविधा अखंड सुरू ठेवण्यासाठीही त्यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे.
अलिबाग-वडखळ रस्त्याची एकूण लांबी 17 किलोमीटर असून हा मार्ग चौपदरी करावा, रायगड किल्ला रस्त्याच्या धर्तीवर आधुनिक रस्ते सुविधा विकसित कराव्यात, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पर्यायी मार्ग, सर्व्हिस रोड आणि पुलांची योजना करावी, तसेच रस्त्यावर स्ट्रीट लाईट, सिग्नल आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना उभाराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. या कामासाठी तातडीने मंजुरी देऊन प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे निर्देश द्यावेत, असेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
अलिबाग-वडखळ मार्गाचे चौपदरीकरण झाल्यास अलिबागमधील पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होईल. पर्यटकांचा प्रवासाचा वेळ कमी होऊन स्थानिक व्यापार, पर्यटन व्यवसाय आणि आर्थिक विकासालाही फायदा होईल. त्यामुळे हा रस्ता केवळ वाहतुकीचा प्रश्न नसून अलिबागच्या भविष्यातील विकासासाठी महत्त्वाचा प्रकल्प असल्याचे मोहिते यांनी अधोरेखित केले आहे.
अलिबाग तालुक्यातील सांबारकुंड धरण प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला असून या प्रकल्पामुळे अनेक शेतकरी, जमीनधारक आणि ग्रामस्थ प्रभावित झाले आहेत. प्रकल्पासाठी जमिनी संपादित झाल्यानंतरही काही प्रकल्पग्रस्तांना सुधारित भूसंपादन कायद्यानुसार आजच्या बाजारभावाप्रमाणे मोबदला मिळालेला नसल्याचा मुद्दा निवेदनात मांडण्यात आला आहे. यासाठी शासन, जिल्हाधिकारी, प्रकल्प प्रशासन आणि संबंधित विभागांची बैठक घेऊन सुधारित मोबदला, पुनर्वसन आणि प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत स्पष्ट निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
उसर येथील गेल इंडिया लिमिटेड प्रकल्पामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी भूमिहीन झाले असून त्यांना रोजगारामध्ये प्राधान्य मिळत नसल्याचा तसेच कंपनीच्या CSR निधीतून स्थानिक पायाभूत सुविधांना अपेक्षित प्राधान्य मिळत नसल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे. प्रकल्पग्रस्तांना नोकरीमध्ये प्राधान्य, स्थानिक तरुणांसाठी कौशल्य प्रशिक्षण, CSR निधीचा सार्वजनिक हिशेब आणि कंपनी, प्रशासन व प्रकल्पग्रस्त यांच्यात बैठक घडवून आणण्याची मागणी करण्यात आली आहे.
अलिबाग जिल्हा रुग्णालयातील CT Scan व MRI तपासणी सुविधा अखंड सुरू राहावी, यासाठी आवश्यक तांत्रिक कर्मचारी, रेडिओलॉजिस्ट, ऑपरेटर आणि उपकरणांच्या देखभालीसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून 24 तास सेवा सुरू ठेवण्याची मागणीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.









