अलिबागच्या विकासाचा चतुःसूत्री संगम; सुविधाविस्ताराला नवी गती


आमदार महेंद्र दळवी यांची साथ, अक्षया नाईक यांचे नेतृत्व, मानसी म्हात्रे यांची विकासाभिमुख भूमिका आणि प्रशांत नाईक यांचा पुढाकार; तीन महत्त्वपूर्ण विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबाग शहराच्या विकासाला लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून चालना मिळत असून, नगरपरिषदेच्या माध्यमातून नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी निगडित सुविधांच्या विस्तारासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. आमदार महेंद्र दळवी यांची भक्कम साथ, नगराध्यक्षा अक्षया नाईक यांचे नेतृत्व, उपनगराध्यक्ष अॅड. मानसी म्हात्रे यांची सक्रिय भूमिका आणि माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांच्या सक्रिय पुढाकारातून अलिबाग शहरातील तीन महत्त्वपूर्ण विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण शुक्रवारी पार पडले. सार्वजनिक व्यायामशाळा, भाजी मार्केट आणि मच्छी मार्केट या कामांमुळे शहरातील नागरिकांसह पर्यटकांनाही अधिक सुविधांचा लाभ मिळणार आहे.

सार्वजनिक व्यायामशाळेच्या इमारतीच्या भूमिपूजनाने शहरातील युवक आणि नागरिकांसाठी आरोग्यविषयक सुविधांच्या उभारणीला चालना मिळाली आहे. नागरिकांना व्यायामासाठी अधिक चांगली जागा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ही व्यायामशाळा महत्त्वपूर्ण ठरणार असून, आरोग्य आणि फिटनेससाठी स्थानिक स्तरावर सुविधा विकसित करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळणार आहे.

भाजी मार्केटसाठी आरक्षित जागेवर भाजी विक्रेत्यांसाठी शेडसह बैठकीची व्यवस्था करण्यात आलेल्या कामाचे लोकार्पण करण्यात आले. यामुळे भाजी विक्रेत्यांना अधिक व्यवस्थित जागा उपलब्ध होण्यासह ग्राहकांनाही खरेदीसाठी सोयीस्कर वातावरण मिळणार आहे. बाजारपेठेतील सुविधांमध्ये सुधारणा झाल्याने नागरिकांच्या दैनंदिन गरजा अधिक सुलभपणे पूर्ण होण्यास मदत होणार आहे.

पी.एन.पी. नगर येथील कै. दत्ताराम शं. पाटील मच्छी मार्केटच्या पुनर्निर्माण कामाचेही लोकार्पण करण्यात आले. अलिबागच्या पर्यटनाशी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेशी मच्छी व्यवसायाचे महत्त्वपूर्ण नाते असल्याने बाजारपेठेच्या सुविधांमध्ये सुधारणा होणे आवश्यक आहे. या कामामुळे मच्छी विक्रेते आणि ग्राहकांना अधिक सोयीस्कर बाजारपेठ उपलब्ध होण्यासह अलिबागला भेट देणाऱ्या पर्यटकांनाही सुविधांचा लाभ मिळणार आहे.

सार्वजनिक व्यायामशाळेच्या नूतनीकरणासाठी विशेष अनुदान योजनेतून एक कोटी, भाजी विक्रेत्यांसाठी शेड व बैठकीच्या व्यवस्थेसाठी नगरपरिषद निधीतून ४५ लाख, तर मच्छी मार्केट पुनर्निर्माणासाठी विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

शहराच्या विकासासाठी नागरिकांच्या गरजांशी निगडित कामांना प्राधान्य देत नगरपरिषदेच्या माध्यमातून विविध सुविधा उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नगराध्यक्षा अक्षया नाईक यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेच्या विकासकामांना आमदार महेंद्र दळवी यांचे सहकार्य आणि प्रशांत नाईक यांचा सक्रिय सहभाग मिळत असल्याने नागरी सुविधा, बाजारपेठ व्यवस्था आणि आरोग्यविषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळत आहे. लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून शहराच्या विकासाला दिशा देणारी ही कामे अलिबागच्या नागरी सुविधांच्या विस्तारातील महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहेत.

या कार्यक्रमाला नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष तथा स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापती ॲड. मानसी म्हात्रे, वीज व सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापती प्रशांत नाईक, मुख्याधिकारी सागर साळुंखे, पाणीपुरवठा व जलनि:सारण समितीचे सभापती अनिल चोपडा, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती डॉ. साक्षी पाटील, उपसभापती ॲड. अश्विनी ठोसर यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका आणि नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारीनागरिक उपस्थित होते.