अलिबाग (प्रतिनिधी): डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नाना पाटील यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. चरीच्या संपाच्या अनुषंगाने ज्या ज्यावेळी डॉ. बाबासाहेब चरी येथे येत त्यावेळी पेझारी येथील घरी भेट देत होते. संविधानातील काही पाने याच भूमीत बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून काढली असल्याचा अभिमान आहे. त्याच संविधानावर लोकशाही टिकून आहे. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, चित्रे, टिपणीस यांसारखी मोठया मंडळींची साथ नाना पाटील यांना मिळाली. त्यामुळे कसेल त्याची जमीन हा कायदा पारित झाला. या ऐतिहासिक लढ्याचे महत्व जगाच्या नकाशावर पोहचविण्याची गरज आहे. त्या पध्दतीने चरी या ठिकाणी सुविधांयुक्त स्मारक होणे गरजेचे आहे. नव्या पिढीला स्फुर्ती देणारा हा संप होता, असा विश्वास शेकाप सरचिटणीस मा. आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
ग्रुप ग्रामपंचायत चरी आयोजित चरी ऐतिहासिक संपाचा 93 वा वर्धापन दिन सोहळा शुक्रवारी (दि.27) चरी येथे साजरा करण्यात आला. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, सहचिटणीस नरेश म्हात्रे, जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य पेझारी येथील अनिल पाटील, शेकापचे ज्येष्ठ नेते अनिल शांताराम पाटील, शेतकरी सभा तालुका अध्यक्ष अनिल पाटील,ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर, माजी सरपंच निलम पाटील, पराग पाटील, सुधाकर पाटील, शंकरराव म्हसकर, गोरखनाथ पाटील, शिवराम महाबळे, प्रशांत पाटील, उदय पाटील, रविंद्र थळे, उमाकांत पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते, चरी, कोपर परिसरातील ग्रामस्थ, महिला, शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी शेकाप सरचिटणीस जयंत पाटील म्हणाले की शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकारातून भव्यदिव्य असा चरी संपाच्या वर्धापन दिनाचा सोहळा साजरा करण्यात आला. पुढच्या पिढीला शेतकरी संपाचा इतिहास समजला पाहिजे. पुर्वजनांनी कशा पध्दतीने लढे देऊन त्यांचा हक्क मिळविला. याची जाणीव आजच्या पिढीला झाली पाहिजे. शेतकरी ज्या जमीनी कसत होते. त्या जमीनीतील दोन आणे पिक फक्त शेतकऱ्यांना मिळत होते. हे पिक वाढवून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी त्यावेळी केली. परंतू सावकारांनी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. शेतकऱ्यांचे नेते आप्पासाहेब अर्थात नारायण नागू पाटील यांचा एक वेगळा प्रभाव त्यावेळेला होता. 1932 मध्ये खऱ्या अर्थाने या लढ्याची सुरुवात झाली. या लढ्याचे केंद्र बिंदू चरी- कोपर होते. देशातील सर्वाधिक काळ चालणारा विक्रमी लढा होता. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, चित्रे, टिपणीस सारखी मोठी मंडळींची साथ नाना पाटील यांना मिळाली. त्यामुळे कसेल त्याची जमीन हा कायदा पारित झाला. या ऐतिहासिक लढ्याचे महत्व जगाच्या नकाशावर पोहचविण्याची गरज आहे. त्या पध्दतीने चरी या ठिकाणी सुविधांयुक्त स्मारक होणे गरजेचे आहे. यातून पर्यटन वाढीला चालना मिळण्यास मदत होईल. चरी खऱ्या अर्थाने या पंचक्रोशीतील स्फुर्तीस्थान व वैभव आहे, हे वैभव आजच्या पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. वेगवेगळ्या साधनांचा वापर करून चरीच्या संपाचा इतिहास प्रत्येक घटकाला समजला पाहिजे,अशा पध्दतीने काम करणे गरजेचे आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
———————
इतिहास पुसण्याचे काम सत्ताधारी करीत आहेत
देशातील प्रदिर्घ काळ चालणारा चरीतील संपाने एक वेगळा इतिहास घडविला आहे. हे वैभव अभ्यासाच्या माध्यमातून जगात पोहचले पाहिजे. ते टीकविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. हा विचार जगला पाहिजे, शेतकरी टिकला पाहिजे या भुमिकेतून काम होणे आवश्यक आहे. आप्पा साहेंबांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. हा इतिहास सत्ताधारी पूसण्याचे काम करीत असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.
————
नव्या पिढीला उत्तम भविष्य देण्यासाठी प्रयत्न करा शेतकरी कामगार पक्षाची स्थापना 1947 मध्ये झाली. चरी येथील शेतकरी संपाला केंद्र बिंदू ठेवून या पक्षाची स्थापना करण्यात आली. या विचारांचा उगम याच ठिकाणापासून झाल्याचे समाधान आहे. संघर्षमय असे राजकारण केले. विचारांचे परिवर्तन करण्याचे काम केले. उद्याचा अलिबाग आणि खारेपाट वेगळ्या स्वरुपाचा असणार आहे. त्यामुळे या बदलत्या राजकारणात चरीच्या संपाचा इतिहास पोहचवून भावी पिढीला उत्तम भविष्य देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
————-
वेगवेगळ्या उपक्रमातून उलगडला इतिहास
शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या हस्ते स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांचे नेते स्व. नारायण नागू पाटील, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच पराग पाटील निर्मित सागर थळे यांनी चरी संपाचा इतिहास शेतकरी गीतातून उलगडला. पीएनपी सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळाच्या वतीने राजन पांचाळ यांच्या मार्फत चरी संपाचे सादरीकरण कला पथकाद्वारे करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून चरी संपाच्या इतिहासाची पाने उलगडण्यात आली.
—————————————–
चरी संपाची प्रेरणा हीच शक्ती – चित्रलेखा पाटील
स्व. नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला 93 वर्षापूर्वी चरीसह पंचक्रोशीतील हजारो शेतकरी एकत्र आले. सावकाराच्या विरोधात आंदोलन करून एक वेगळा इतिहास घडविला.या लढ्यातून चरीचा संप उदयास आला. यातून प्रेरणा घेऊनच प्रत्येकाने पुढे जाणे गरजेचे आहे. हा विचार महत्वाचा आहे. चरी येथे झालेल्या चळवळीमुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांचे अस्तित्व आहे. चरीचा संप अलिबागची शान आणि बाण आहे. हा विचार गावागावात पोहचविण्यासाठी कटीबध्द आहे. या संपाची प्रेरणा आजच्या भांडवलदारांविरोधात लढण्याची शक्ती आहे, असे शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील म्हणाले.
भव्यदिव्य असा चरी वर्धापन दिनाचा सोहळा आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे नियोजनही उत्तम आहे. शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीने या कार्यक्रमाची शोभा अधिक वाढली आहे. चरीच्या संपाचा इतिहास सर्वसामान्यांसाठी खुप महत्वाचा आहे. या लढ्यातून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने अन्यायाविरोधात चळवळ उभी करणे गरजेचे आहे. सध्या भांडवलदारांच्या नावाने देशात आधुनिक खोती पध्दत सुरु आहे. सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांची फसवणूक करून जमीनी घेतल्या जात आहेत. विकास होत असताना जमीनी आपल्या हक्काची पाहिजे. त्यामुळे जमीनी विकू नका असा मोलाचा सल्ला चित्रलेखा पाटील यांनी दिला. त्या पुढे म्हणाल्या की,महाराष्ट्र दुष्काळातून जात असताना वेगळ्या पध्दतीने शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा मोलाचा मंत्र दिला. संघटीतमध्ये प्रचंड ताकद आहे. मागील काही महिन्यापुर्वी दिल्ली येथे झालेल्या विद्यार्थ्यांच्या मोर्चाने दाखवून दिले आहे.ज्यावेळेला काहीही सुविधा नव्हत्या.त्यावेळी हजारो शेतकरी एकत्र आले. त्यामुळी चरी संपाचा उदय झाला. प्रदिर्घ काळ झालेल्या या संपाची दखल सरकाराला घ्यावी लागली. यातून कुळ कायद्याचा जन्म झाला. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी ताठ मानेने जगत असल्याचे चित्रलेखा पाटील म्हणाल्या.
या सोहळ्या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते चरी, रायंदे, कोपरपाडा, कोपर येथील मुला व मुलींना १०७ सायकलींचे वाटप करण्यात आले.
—————————————–









