अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबाग तालुक्यातील मल्याण फाटा येथे सरकारी रुग्णवाहिकेच्या धडकेत चिंचोटी येथील हेमंत दामोदर पाटील (वय ५२) यांचा शनिवारी मृत्यू झाला. कुटुंबीयांना आर्थिक मदत आणि नोकरीचे आश्वासन मिळाल्यानंतर तब्बल २४ तासांनी मृतदेह ताब्यात देण्यास संमती देण्यात आली. मृताच्या दोन्ही मुलांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येणार असून, पत्नीला शासकीय किंवा उपजिल्हा रुग्णालयात बाह्यस्रोताद्वारे नोकरी देण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले आहे.
शनिवारी (२८ नोव्हेंबर) दुपारी मल्याण फाटा येथे हा अपघात झाला. हेमंत पाटील हे दुचाकीवरून जात असताना रोह्याकडून अलिबागच्या दिशेने येणाऱ्या शासकीय रुग्णवाहिकेने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर चिंचोटी ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी करत कुटुंबाला आर्थिक मदत आणि एका सदस्याला नोकरी देण्याची मागणी केली.
मागण्यांवर ठोस निर्णय होत नसल्याने नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. रविवारी सकाळीही ग्रामस्थांनी रुग्णालयाबाहेर ठिय्या दिल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी-घुगे आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी नातेवाईकांशी चर्चा केली. त्यानंतर मदतीचे लेखी आश्वासन देण्यात आले. या मागणीसाठी शेकापच्या ॲड. मानसी म्हात्रे आणि सामाजिक कार्यकर्ते ॲड. राकेश पाटील यांनी पुढाकार घेतला होता.
प्रशासनाच्या आश्वासनानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास संमती दिली. दरम्यान, या अपघाताची पोलीस नोंद करण्याची प्रक्रिया तब्बल २४ तासांनंतर सुरू झाली.
रुग्णवाहिकेचे फिटनेस प्रमाणपत्र नऊ महिन्यांपासून संपुष्टात
अपघातास कारणीभूत ठरलेल्या महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या रुग्णवाहिकेचे फिटनेस प्रमाणपत्र तब्बल नऊ महिन्यांपूर्वीच संपल्याची बाब समोर आली आहे. मुदत संपलेले फिटनेस प्रमाणपत्र असतानाही ही रुग्णवाहिका रस्त्यावर धावत होती. वाहनाची तांत्रिक तपासणी आणि फिटनेस प्रमाणपत्राचे नूतनीकरण न करताच रुग्णवाहिका सेवेत कशी वापरली जात होती, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणात संबंधित यंत्रणेची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.









