रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याने दक्षिण रायगड भाजपमध्येच नवा सवाल; सभागृहातील ‘अर्ध्या टाळ्यां’चेही केले सूचक विश्लेषण
अलिबाग(प्रतिनिधी): “तुम्ही कॉन्ट्रॅक्टर म्हणून राजकारणात काम करायला आला असाल, तर भारतीय जनता पक्षामध्ये तुम्हाला कुठेही स्थान नाही, हे सर्वांनी मनात ठसवून ठेवा,” असा स्पष्ट इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अलिबाग येथे दिला. दक्षिण रायगड जिल्हा भाजपच्या विस्तृत कार्यकारिणीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना चव्हाण यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या या भूमिकेला सभागृहात टाळ्या मिळाल्या; मात्र त्या टाळ्या ‘अर्ध्याच’ वाजल्याचे स्वतः चव्हाण यांनीच उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे टाळ्यांचा आवाज कमी का झाला, यापेक्षा तो नेमका कोणाच्या मनातील संकोचाचा आवाज होता, हा राजकीय सवाल आता उपस्थित झाला आहे.
राजकारणात कार्यकर्ता म्हणून काम करण्याऐवजी केवळ कंत्राटी कामे मिळविणे, त्यातून आर्थिक हितसंबंध साधणे आणि त्याचबरोबर पक्षाचे पद भूषविणे, या प्रवृत्तीवर चव्हाण यांनी बोट ठेवले. मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपच्या अंतर्गत वर्तुळातच वेगळी चर्चा सुरू झाली आहे. कारण कॉन्ट्रॅक्टर हा शब्द उच्चारताना चव्हाण यांचा रोख नेमका कोणाकडे होता? हा प्रश्न आता भाजपच्या कार्यकर्त्यांमध्येच चर्चेचा विषय ठरत आहे.
आज जवळपास प्रत्येक राजकीय पक्षात ठेकेदार, व्यावसायिक आणि विविध क्षेत्रांतील आर्थिक हितसंबंध असलेले लोक सक्रिय आहेत. भाजपही त्याला अपवाद नाही. उलट रायगडसह राज्यातील भाजपच्या संघटनेत कंत्राटी व्यवसायाशी संबंधित अनेक व्यक्ती विविध स्तरांवर कार्यरत असल्याची चर्चा आहे. काही जण पक्षाची महत्त्वाची पदेही सांभाळत आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांनी दिलेला हा इशारा सर्वांसाठी समान नियम आहे की निवडकांसाठी राजकीय संदेश, याचे उत्तर मिळणे महत्त्वाचे ठरणार आहे.
विशेष म्हणजे, पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या जवळच्या वर्तुळातही कंत्राटी व्यवसायाशी संबंधित व्यक्ती कार्यरत असतील, तर चव्हाण यांच्या या वक्तव्याची व्याप्ती आणखी वाढते. मग हा संदेश स्वतःच्या जवळच्या सहकाऱ्यांनाही लागू आहे का? की पक्षाच्या इतर कार्यकर्त्यांनी ‘कॉन्ट्रॅक्टर’ होऊ नये, एवढ्यापुरताच हा सल्ला आहे? जर तत्त्व सर्वांसाठी समान असेल, तर जवळच्या व्यक्तींनाही त्याच मापाने मोजले जाणार का? हा प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित होतो.
चव्हाण यांनी सभागृहातील टाळ्यांकडेही लक्ष वेधले. “टाळ्या अर्ध्याच वाजल्या,” असे त्यांनी सांगितल्यानंतर उपस्थितांमध्येही कुजबुज सुरू झाली. त्यांच्या भूमिकेला पूर्ण समर्थन न देणारे अर्धे सभागृह नेमके कोण होते, हा प्रश्नही त्यामुळे अनुत्तरित राहिला. टाळ्या अर्ध्या वाजल्या की पक्षातील वास्तव अर्धेच उघड झाले? असा सवालही या निमित्ताने उपस्थित होत आहे.
कंत्राटदारांनी राजकारणात यायचेच नाही, अशी भूमिका भाजपने घेतली असेल तर ती स्वागतार्ह आहे; मात्र त्यासाठी निकषही स्पष्ट असायला हवेत. कंत्राटी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीने पक्षाचे पद भूषवू नये, पक्षाच्या माध्यमातून राजकीय प्रभाव निर्माण करू नये आणि सरकारी कंत्राटांशी संबंधित हितसंबंधांपासून पक्षाच्या राजकारणाला दूर ठेवावे, असा स्पष्ट नियम पक्षाने जाहीर करणे अपेक्षित आहे. अन्यथा ‘कॉन्ट्रॅक्टर नको’ हा सिद्धांत राहील आणि ‘आपले कॉन्ट्रॅक्टर चालतील’ अशी धारणा कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होण्याचा धोका आहे.
रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना संघटनेशी प्रामाणिक राहण्याचा संदेश दिला असेल, तर त्याची पहिली कसोटी पक्षाच्या आतच लागणार आहे. कारण राजकारणात कंत्राटदार नकोत, असे सांगणे सोपे आहे; पण आपल्या राजकीय सावलीत उभ्या असलेल्या कंत्राटदारांकडेही त्याच नजरेने पाहण्याचे धाडस दाखवणे, ही खरी कसोटी आहे.
त्यामुळे अलिबागच्या बैठकीत चव्हाण यांनी केलेल्या या वक्तव्याची चर्चा केवळ दक्षिण रायगड भाजपच्या कार्यकारिणीपुरती मर्यादित राहणार नाही. ‘कॉन्ट्रॅक्टरना भाजपमध्ये स्थान नाही’ या घोषणेचा फटका सर्वांना समान बसणार की काही जणांना पक्षाच्या जवळिकीमुळे अपवाद मिळणार, याकडे आता भाजपच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.









