अलिबाग(प्रतिनिधी) : समाजमाध्यमांवरून होणाऱ्या अपप्रचाराला विकासकामांची माहिती देऊन उत्तर देण्याची रणनीती भाजपने आखली आहे. विशेषतः जेनझी पिढीपर्यंत विकासकामे आणि सरकारच्या योजनांची माहिती प्रभावीपणे पोहोचविण्यावर भर देण्याचा निर्णय भाजप दक्षिण रायगड जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. ‘अपप्रचाराला विकासगाथा कथनाने उत्तर द्या,’ असा प्रस्ताव भाजपाचे जिल्हा सरचिटणीस ॲड. महेश मोहिते यांनी मांडला व त्यास सर्वानुमते या बैठकीत मंजूरी देण्यात आली.
अलिबाग येथील क्षात्रक्ये समाज सभागृहात गुरुवार (ता.१०) रोजी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारणी बैठकीला प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, आ. योगेश सागर, आ. रविंद्र पाटील, आ. प्रमोद जठार, माजी आमदार पंडित पाटील, जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, सरचिटणीस सतीश धारप, वैकुंठ पाटील, ॲड. महेश मोहिते, हेमा मानकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा चित्रा पाटील, पेण नगराध्यक्षा प्रीतम पाटील, पाली नगराध्यक्ष पराग मेहता,गीता पालरेचा, युवा मोर्चा अध्यक्ष निलेश थोरे, हेमंत दांडेकर, निमेश वाघमारे, आलाप मेहता, उदय काठे उपस्थित प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
अभिनंदन ठराव युवा मोर्चाचे रोशन चाफेकर यांनी मांडला. या वेळी आपल्या भाषणात त्यांनी युवा शक्ती, संधी आणि विकसित भारताच्या संकल्पना जिल्ह्यातील तळागाळातील युवकांसमोर मांडल्या. देशात सुरु असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला सामोरे जाण्यासाठी भाजपाकडून जिल्ह्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व, युवकांसाठी करण्यात आलेले काम आणि देशाच्या विकासाचे ध्येय यामुळे युवकांमध्ये पोहचवण्यात येणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने केलेल्या विकासकामांची माहितीही जनतेपर्यंत पोहोचविण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली. महाराष्ट्राला विकसित राज्य बनविण्याच्या दृष्टीने आगामी काळातील विकासाचा आलेख जनतेसमोर मांडण्याचा निर्णय घेण्यात आला.
बारा वर्षांत परिवर्तनाचा दावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या २०१४ ते २०२६ या कालावधीतील कामगिरीचा आढावा घेताना देशाच्या सर्वच क्षेत्रांत परिवर्तन झाल्याचा दावा प्रस्तावात करण्यात आला आहे. या कालावधीत २५ कोटी नागरिक गरिबीतून बाहेर आले असून, २०१४ मध्ये नाजूक अर्थव्यवस्था म्हणून ओळखला जाणारा भारत आज जगातील चौथी प्रमुख अर्थव्यवस्था बनल्याचे भाजपने म्हटले आहे.संरक्षण उत्पादनात चारपट, खादी व ग्रामोद्योग उत्पादनात पाचपट, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात सातपट आणि मोबाईल फोन उत्पादनात ३५ पट वाढ झाल्याचा दावा करण्यात आला. डिजिटल व्यवहारातही १०० पट वाढ झाल्याचे प्रस्तावात नमूद आहे.
१२ वर्षात घराघरात पाणी
घरांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा, गॅस जोडणी आणि शौचालयांची उभारणी यामध्येही मागील बारा वर्षांत मोठी प्रगती झाल्याचे भाजपने म्हटले आहे. रेल्वेच्या विद्युतीकरणाचे काम जवळपास शंभर टक्के पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला. महिलांना संसद व विधिमंडळात आरक्षण देण्यासाठी मंजूर करण्यात आलेला ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ हाही सरकारच्या महत्त्वाच्या निर्णयांपैकी एक असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले.
मोदी, फडणवीस यांच्या कार्याचे कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना गेल्या १२-१३ वर्षांत त्यांनी अविरतपणे काम केल्याचा दावा प्रस्तावात करण्यात आला. परदेश दौऱ्यांदरम्यान मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव करून त्यातून मिळालेला निधी राष्ट्रहितासाठी वापरण्याच्या त्यांच्या भूमिकेचाही उल्लेख करण्यात आला. मोदी यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून प्रदीर्घ काळ काम करताना वैयक्तिक जीवनापेक्षा राष्ट्रहिताला प्राधान्य दिल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले. आईच्या निधनानंतर अंत्यविधी आटोपून अल्पावधीतच नियोजित कामाला लागल्याचा प्रसंगही त्यांच्या कार्यतत्परतेचे उदाहरण म्हणून मांडण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचेही बैठकीत कौतुक करण्यात आले. कोरोना काळात मुख्यमंत्री असताना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांनी सामान्य नागरिकांना ज्या सरकारी रुग्णालयात उपचार मिळतात, त्याच ठिकाणी उपचार घेतल्याचा उल्लेख करण्यात आला. मोदी आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश व महाराष्ट्राच्या विकासाला मिळालेल्या गतीची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. राष्ट्रीय व प्रदेश नेतृत्वाचे अभिनंदन करणारा प्रस्ताव दक्षिण रायगड जिल्हा कार्यकारिणीने मंजूर केला.









