लालबागच्या राजाचा फर्स्ट लूक समोर; भाविकांना झाले प्रथम दर्शन


मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचा यंदाच्या गणेशोत्सवातील बहुप्रतीक्षित फर्स्ट लूक आज, ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता समोर आला. लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन होताच भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरवर्षी लालबागच्या राजाच्या मूर्तीचे रूप, आकर्षक सजावट आणि दागदागिन्यांकडे गणेशभक्तांचे विशेष लक्ष असते. यंदाच्या मूर्तीचा फर्स्ट लूक समोर येण्यापूर्वीपासूनच भाविकांमध्ये मोठी उत्सुकता होती. अखेर आज सायंकाळी ७ वाजता ‘राजा’चे प्रथम दर्शन झाले आणि गणेशभक्तांची प्रतीक्षा संपली.

लालबागचा राजा हा मुंबईसह महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील गणेशभक्तांसाठी श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागच्या राजाची विशेष ओळख आहे. गणेशोत्सवाच्या काळात देशाच्या विविध भागांतून लाखो भाविक राजाच्या दर्शनासाठी मुंबईत येतात.

यंदाच्या फर्स्ट लूकमध्ये लालबागच्या राजाचे भव्य आणि आकर्षक रूप भाविकांसमोर आले आहे. राजाचे दर्शन होताच सोशल मीडियावरही फर्स्ट लूकचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागले आहेत. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये उत्साहाला उधाण आले आहे.

लालबागच्या राजाचा फर्स्ट लूक समोर आल्यानंतर आता गणेशोत्सवाच्या प्रत्यक्ष सोहळ्याची चाहूल लागली असून, आगामी दिवसांत राजाच्या दर्शनासाठी मुंबईत भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.