“आम्ही त्यांना बिनविरोध निवडून दिले, त्यांनी मला बिनविरोध पालकमंत्री केले” : भरत गोगावले
रायगड (प्रतिनिधी): “मला रायगडचा पालकमंत्री करण्यामध्ये आमदार अनिकेत तटकरे यांचा सिंहाचा वाटा आहे. आम्ही त्यांना बिनविरोध निवडून दिले, त्यामुळे त्यांनी मला बिनविरोध पालकमंत्री केले,” असे स्पष्ट वक्तव्य रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी केल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेषतः अनिकेत तटकरे यांच्यावर सातत्याने टीका करणाऱ्या आमदारांच्या भूमिकेवर या वक्तव्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून गेल्या काही काळापासून महायुतीच्या राजकारणात विविध चर्चा सुरू होत्या. अखेर भरत गोगावले यांच्याकडे रायगडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर आता स्वतः गोगावले यांनीच या निर्णयामागे आमदार अनिकेत तटकरे यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे जाहीरपणे सांगितल्याने राजकीय समीकरणांची नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
गोगावले यांच्या वक्तव्याचा सर्वाधिक राजकीय अर्थ काढला जात आहे तो अनिकेत तटकरे यांच्यावर टीका करणाऱ्या आमदारांच्या भूमिकेबाबत. एका बाजूला तटकरे यांच्यावर राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असताना, दुसऱ्या बाजूला रायगडचे पालकमंत्रीच तटकरे यांचा पालकमंत्रीपद मिळवून देण्यात ‘सिंहाचा वाटा’ असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे “पालकमंत्रीच तटकरे यांच्या भूमिकेचे श्रेय देत असतील, तर तटकरे यांच्यावर टीका करणारे आमदार आता काय म्हणणार?” असा सवाल राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.
गोगावले यांच्या या विधानामुळे महायुतीतील अंतर्गत राजकीय समीकरणे, परस्पर सहकार्य आणि रायगडमधील नेतृत्वाच्या दाव्यांवर पुन्हा चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात तटकरे यांच्या विरोधकांकडून या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








