चेंढरेच्या आयान पाटीलची अंतराळाकडे भरारी; राष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये देशात प्रथम


अलिबाग (प्रतिनिधी): चेंढरे येथील अवघ्या पाच वर्षांच्या आयान पाटीलने राष्ट्रीय ऑलिम्पियाड परीक्षेत ८६.६७ टक्के गुण मिळवत देशात प्रथम क्रमांक पटकावला. सुमारे ७ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत सर्वात लहान स्पर्धक म्हणून आयानने मिळवलेले यश कौतुकास्पद ठरले आहे.

आयानला लहानपणापासूनच विज्ञान आणि अंतराळ क्षेत्राची आवड असून, भविष्यात रॉकेट तयार करून वैज्ञानिक होण्याचे त्याचे स्वप्न आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शिवसेना युवा नेत्या तथा माजी पंचायत समिती सदस्या जुईली दळवी-जुईकर आणि रायगड जिल्हा परिषद सदस्या अदिती नाईक- दळवी  यांनी भेट घेऊन त्याचा गौरव केला.

कमी वयात राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश चेंढरे, अलिबाग आणि रायगडसाठी अभिमानाची बाब असून, आयानने भविष्यात अंतराळ क्षेत्रात मोठे योगदान द्यावे, अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.