ठाणे-अलिबाग एसटीला सागाव येथे अपघात; चालक-वाहकासह २३ प्रवासी सुखरूप


कार्लेखिंड उतारावरील सागावनजीक रस्त्यालगत एसटी घसरली; काही प्रवासी किरकोळ जखमी

अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग-पेण रस्त्यावरील कार्लेखिंड उतारावर अलिबाग सागाव येथे ठाणे-अलिबाग एसटी बसला अपघात झाला. समोरून येणाऱ्या एसटी बसला वाचविण्याच्या प्रयत्नात ठाणे-अलिबाग बसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या साईडपट्टीवरून घसरून नजीकच्या शेतात जाऊन थांबली. रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला. बसमध्ये चालक-वाहकासह एकूण २३ प्रवासी होते. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असून सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती आहे. काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याचे समजते.

गणेशोत्सवाची धामधूम सुरू असल्याने चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणातील आपल्या गावाकडे रवाना होत आहेत. रविवारी सकाळी उरण आगाराची ठाणे-अलिबाग एसटी बस ठाणे येथून अलिबागच्या दिशेने निघाली होती. कार्लेखिंड परिसरातील अवघड वळण पार करून ही बस अलिबागच्या दिशेने येत असताना सागाव गावानजीक समोरून पेणच्या दिशेने जाणारी एसटी बस आली.

समोरून येणाऱ्या बसला धडक होऊ नये, यासाठी ठाणे-अलिबाग एसटीच्या चालकाने प्रसंगावधान राखत बस बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे बस रस्त्याच्या साईडपट्टीवरून घसरत नजीकच्या शेतात गेली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

अपघातावेळी बसमध्ये चालक-वाहकासह २३ प्रवासी प्रवास करीत होते. बस रस्त्यालगत घसरल्याने काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना सुरक्षितपणे बसमधून बाहेर काढले. सुदैवाने या अपघातात कोणतीही गंभीर जीवितहानी झाली नाही.

अपघातानंतर काही काळ अलिबाग-पेण मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, समोरून आलेल्या एसटीला वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची माहिती चालकाने दिली असून, अपघाताच्या नेमक्या कारणाबाबत संबंधित यंत्रणेकडून पुढील तपास करण्यात येत आहे.