अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यात लागवडीखालील क्षेत्र सातत्याने कमी होत असून खारभूमी विकास आणि जलसंधारणाच्या योजनांच्या अंमलबजावणीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप माजी आमदार पंडित पाटील यांनी केला. अलिबाग येथील कृषी विभागाच्या कार्यालयाला भेट देऊन त्यांनी अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील शेती, खारभूमी योजना आणि जलसंधारणाच्या कामांची माहिती घेतली.
मानकुळे, बहिरीचापाडा, घेरंड-शहापूर हाशिवरे, सुडकोली यांसह अनेक खारभूमीच्या योजना आपल्या आमदारकीच्या काळात मंजूर झाल्या होत्या. मात्र, सात वर्षांनंतरही काही योजनांची कामे पूर्ण झालेली नाहीत, अशी खंत पंडित पाटील यांनी व्यक्त केली.
अलिबाग तालुक्यातील मानकुळे, शहाबाज, कुर्डूस, कुसुमळे,हाशिवरे,सुडकोली तसेच रोहा तालुक्यातील करंजवीरा, सुडकोली परिसरातील हजारो हेक्टर शेतीला खारभूमीची सुविधा मिळाल्यास हे क्षेत्र पुन्हा लागवडीखाली आणता येऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात असल्या तरी त्यांचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. जलसंधारणाची कामे केवळ बांधकामापुरती मर्यादित न राहता त्याचा थेट फायदा शेतीला झाला पाहिजे, असे पंडित पाटील यांनी स्पष्ट केले.
खारभूमी व जलसंधारणाच्या योजनांवर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी प्रभावी नियंत्रण ठेवावे. संबंधित योजनांसाठी कृषी विभागाची ना-हरकत घेण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. रखडलेल्या योजनांचा प्रश्न मंत्री भरतशेठ गोगावले यांच्याकडे मांडण्यासाठी भेट घेणार असल्याचेही पंडित पाटील यांनी सांगितले.









