हाशिवरे येथे समाजमंदिराच्या कामाचा कोनशिला पूजन समारंभ उत्साहात


इंद्रभुवन आळीतील ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी पूर्णत्वास; अमितदादा नाईक यांच्या प्रयत्नांना यश

अलिबाग (प्रतिनिधी): हाशिवरे येथील इंद्रभुवन आळीमध्ये रायगड जिल्हा परिषद शेष निधीतून मंजूर करण्यात आलेल्या समाजमंदिराच्या बांधकामाचा कोनशिला पूजन समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. रायगड जिल्हा परिषद सदस्य तथा प्रतोद अमितदादा नाईक यांच्या प्रयत्नातून या समाजमंदिराच्या कामाला मंजुरी मिळाली असून, त्यांच्या हस्ते कोनशिला पूजन करून प्रत्यक्ष बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला.
इंद्रभुवन आळीतील ग्रामस्थांना सामाजिक, सांस्कृतिक तसेच विविध सार्वजनिक कार्यक्रमांसाठी हक्काची व आवश्यक सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने समाजमंदिराचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची मागणी आता प्रत्यक्षात साकार होत असल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
समाजमंदिरामुळे ग्रामस्थांना विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, बैठका तसेच सार्वजनिक उपक्रम आयोजित करण्यासाठी उपयुक्त जागा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे परिसरातील सामाजिक उपक्रमांना चालना मिळण्यास मदत होणार असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
कोनशिला पूजन कार्यक्रमास इंद्रभुवन संग्राम मंडळाचे पदाधिकारी व सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी समाजमंदिराच्या कामासाठी पुढाकार घेऊन ते मंजूर करून दिल्याबद्दल अमितदादा नाईक यांचे आभार मानले.
यावेळी अमितदादा नाईक यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खारेपाटातील विविध समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवण्याची ग्वाही दिली. परिसरातील विकासकामांना प्राधान्य देऊन विकासाची गती कायम ठेवण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.