८० वर्षांचा अंधार संपला; कुर्डूसच्या खुटेगाव आदिवासी वाडीत प्रथमच वीज


आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रयत्नांना यश; घरोघरी वीज मीटर बसल्याने आदिवासी बांधवांचा आनंदोत्सव

अलिबाग (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याला आठ दशके उलटून गेल्यानंतरही अलिबाग तालुक्यातील कुर्डूस येथील डोंगरमाथ्यावर वसलेली खुटेगाव आदिवासी वाडी आजवर विजेपासून वंचित होती. वीज नसल्यामुळे येथील नागरिकांना अनेक वर्षे अंधारात जीवन जगावे लागत होते. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह दैनंदिन जीवनावरही त्याचा परिणाम होत होता. मात्र, आता या वाडीतील नागरिकांच्या आयुष्यातील अंधार दूर झाला असून, तब्बल ८० वर्षांनंतर खुटेगावमध्ये पहिल्यांदाच विजेचा प्रकाश पोहोचला आहे.
आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रयत्नांतून वीज जोडणीचे काम पूर्ण झाले असून, वाडीतील घराघरांत वीज मीटर बसविण्यात आले. अनेक दशकांची प्रतीक्षा संपून घरात विजेचा दिवा पेटल्याने आदिवासी बांधवांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
नाचत-गाजत आनंदोत्सव
वाडीमध्ये पहिल्यांदाच वीज पोहोचल्याचा आनंद नागरिकांनी पारंपरिक पद्धतीने साजरा केला. अबालवृद्धांनी एकत्र येत नाचत-गात आनंदोत्सव साजरा केला. घराघरांत विजेचा प्रकाश पडलेला पाहून नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून येत होता. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी संपूर्ण वाडी एकत्र आली होती.
वीज उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना रात्री अभ्यास करण्यासाठी सुविधा मिळणार असून, मोबाईल चार्जिंग, घरगुती उपकरणांचा वापर तसेच इतर दैनंदिन कामे सुलभ होणार आहेत. त्यामुळे वाडीतील नागरिकांच्या जीवनमानात बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
‘एकही आदिवासी वाडी अंधारात राहता कामा नये’
वीज जोडणीच्या उद्घाटनप्रसंगी आमदार महेंद्र दळवी यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “अलिबाग तालुक्यातील एकही आदिवासी वाडी विजेविना अंधारात राहता कामा नये, हाच आमचा संकल्प आहे. खुटेगावमध्ये वीज पोहोचल्याचा हा क्षण माझ्यासाठीही भावनिक आणि समाधानाचा आहे. दुर्गम भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील.”
खुटेगाव आदिवासी वाडीमध्ये तब्बल आठ दशकांनंतर वीज पोहोचल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, ‘अंधारातून प्रकाशाकडे’ झालेला हा प्रवास वाडीच्या विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.