टकमक टोकावरून ठाण्यातील तरुणाची दरीत उडी?


पत्नीला व्हॉट्सॲपवर संदेश पाठवून मोबाईल केला बंद; ड्रोनच्या सहाय्याने शोध घेतल्यानंतर मृतदेह आढळला

रायगड (प्रतिनिधी) : किल्ले रायगडावरील टकमक टोक परिसरात शनिवारी (३ ऑक्टोबर) आलेले ठाणे येथील ३७ वर्षीय सुयोग सुरेश पांचाळ हे बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती. पत्नीला व्हॉट्सॲपवर संदेश पाठवून टोकाचे पाऊल उचलत असल्याचे सांगितल्यानंतर त्यांचा मोबाईल बंद झाला. त्यानंतर सुरू करण्यात आलेल्या शोधमोहीमेत रविवारी दरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी नेमक्या कोणत्या कारणातून हे टोकाचे पाऊल उचलले, याचा तपास महाड तालुका पोलिसांकडून सुरू आहे.

सुयोग पांचाळ हे मूळचे बीजघर, खेड, जि. रत्नागिरी येथील असून सध्या ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात राहत होते. शनिवारी पहाटे ते किल्ले रायगडावर आले होते. त्यांनी आपली अर्टिगा कार (एमएच ०४ एमआर ६१६७) किल्ल्याच्या पायथ्याशी उभी केली आणि पायरी मार्गाने गडावर प्रवेश केला.

सकाळी साडेसातच्या सुमारास ते टकमक टोक परिसरात पोहोचले. तेथून त्यांनी पत्नीला व्हॉट्सॲपवर संदेश पाठविला तसेच टकमक टोकाचे काही फोटोही पाठविले. त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद झाला. बराच वेळ संपर्क न झाल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला.

या घटनेची माहिती मिळताच त्यांचे भाऊ सुवेल पांचाळ रायगडावर दाखल झाले. त्यांनी टकमक टोक तसेच गड परिसरात सुयोग यांचा शोध घेतला; मात्र त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. शनिवारी सायंकाळी महाड तालुका पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी गड परिसरात शोध घेतला असता सुयोग यांची कार पायथ्याशी आढळून आली. रात्रीच्या अंधारामुळे शोधमोहीम थांबविण्यात आली.

रविवारी सकाळी महाड तालुका पोलिस, एसव्हीआरएसएस रेस्क्यू पथक आणि स्थानिक नागरिकांनी पुन्हा शोधमोहीम सुरू केली. टकमक टोकाच्या दरीत ड्रोनच्या सहाय्याने पाहणी करण्यात आली. यावेळी दरीत काहीतरी आढळून आल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिस निरीक्षक अभिजीत नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव पथकाने दरीत उतरून पाहणी केली. यावेळी सुयोग पांचाळ यांचा मृतदेह आढळून आला असून तो दरीतून बाहेर काढण्यात आला.

सुयोग पांचाळ यांनी कोणत्या कारणामुळे टोकाचे पाऊल उचलले, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास महाड तालुका पोलिसांकडून सुरू आहे.